लोकशाही संपादकीय लेख
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला निर्घुण हत्या झाल्यानंतर हत्या करणारे आरोपी फरार झाले होते. आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि हत्येसंबंधित मंत्री धनंजय मुंडे यांचा साथीदार वाल्मीक कराड हा ३१ डिसेंबर पर्यंत फरार होता. दरम्यानच्या काळात देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला. विधानसभेत प्रकरण गाजले. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिवेशनात जोरदार आवाज उठवला. ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली, त्या मारेकरी आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत भाजपचे बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे आमदार क्षीरसागर, मुंब्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत जोरदार बाजू मांडली. त्यात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
संतोष देशमुख यांच्या हत्येची तपासणी निःपक्षपतीपणे होईल, त्यासाठी एसआयटी मार्फत तसेच निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आणि आरोपीला कडक शासन होईल असे सांगून तातडीने सीआयडीकडे तपास दिला गेला. आरोपीचा शोध सुरू झाला. खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड ३१ डिसेंबरला पुणे सीआयडीला शरण आला. त्याच्या शरण येण्यावरून मोठी टीका झाली. त्यानंतर हत्येतील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व इतरांना अटक झाली. सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. या हत्येशी वाल्मीक कराडचा संबंध असला, तरी त्याच्यावर हत्येच्या गुन्ह्याऐवजी खंडणीचा गुन्हा दाखल असल्याने १४ दिवसानंतर वाल्मीक कराडची पोलीस कस्टडी संपल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यामुळे तपास यंत्रणेविरुद्ध बीड जिल्ह्यात संताप सुरू झाला. सर्व आरोपींना मकोका लावा ही मागणी पुढे आली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका लावण्याचे आदेश दिल्यानंतर मकोका अंतर्गत वाल्मीक कराडला पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले, आणि त्याचा हत्येशी सुद्धा संबंध असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने वाल्मीक कराडला सात दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली. त्यानंतर वाल्मीक कराडच्या समर्थकांनी परळी बंदचे आंदोलन छेडले. वाल्मीक कराडच्या कुटुंबीयांनीही आंदोलन पुकारले. त्यामुळे बीड जिल्ह्यात एक वेगळेच वातावरण निर्माण झाल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे..
“माझा संतोषी दुरानवयानेही संबंध नाही.. मी राजीनामा दिला नाही आणि देणारही नाही..” म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची आता मोठी गोची झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुद्धा निःपक्षपातीपणे संतोष देशमुख हत्तेचा तपास होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करून घरचा आहेर दिला. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराडवर हत्येचा गुन्हा आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत बीड जिल्हा सोडणार नाही म्हणत बीड जिल्ह्यात सत्यशोधक आंदोलन पुकारले आहे. अनेक पुरावे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केले. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचे पुरावे त्यांनी दिलेत. वाल्मीक कराड यांच्या वाळूमाफिया परळी थर्मल पावर स्टेशनच्या राखेचे माफिया यांच्याशी संबंध असून अनेक एकर जमिनीच्या सातबारा उताऱ्यांवर वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांची नावे एकत्र असल्याचे दाखवून दिले. महाराष्ट्रात राजकीय गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा गाजतो आहे. त्याला ओबीसी असो, मराठा असो, राजकारणाचा रंग देण्यात आला. गेल्या दीड महिन्यापासून दररोज बीड जिल्ह्याच्या बातम्यांनी माध्यमांचे रकाने भरून येत आहेत. नैतिकतेची जबाबदारी घेऊन धनंजय मुंडे यांचा अजित पवारांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी जोर धरली असताना अजित पवारांचाही हेकेखोरपणा नडला. त्यामुळे त्यांचा पक्ष बदनाम होतो आहे, हे लक्षात येत नाही का? बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि त्यातच परळी पॅटर्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे…!