लोकशाही संपादकीय लेख
जळगावकरांना नियमित तसेच सुधारित प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून अमृत पाणीपुरवठा योजना विलंबाने का होईना अमलात आणली. शहरासाठी जुनी पाणीपुरवठा योजना कुचकामी आणि कालबाह्य झाली असल्याने जळगावकरांना तसेच जळगाव शहराच्या वाढीव भागात पाणीपुरवठा करण्यास अनेक अडचणी येत होत्या. त्यातच गिरणा नदीच्या पाण्यावर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने उन्हाळ्यात गिरणा धरणातील पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासाठी जळगावकरांचे फार हाल होत होते. त्यातच वितरण व्यवस्था योग्य रीतीने नसल्याने शहरवासीयांना चार ते पाच दिवस तसेच आठ-आठ दिवस नळाचे पाणी येत नव्हते. अमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यावर तसेच वाघुर धरणातून पाण्याचे वितरण होणार असल्याने जळगावकरांना दररोज 24 तास नळाला पाणी दिले जाईल, असे आश्वासन दिले गेले होते. एक तर अमृत पाणीपुरवठा योजना तयार होण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी लागला. त्याचा परिणाम जळगाव शहरातील रस्ते पूर्णपणे खोदले गेल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली होती. म्हणजे जळगावकरांना एक तर नियमित पाणी मिळत नव्हते, त्यात जळगाव शहरातील रस्त्यांची चाळणी झाल्याने शहरवासियांना रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आणि वाहने चालवणे तर अधिक मुश्किल झाले होते.
अजूनही अमृत पाणीपुरवठा योजना 100% पूर्ण झालेली नाही. त्यातच जुनी पाईपलाईन असताना दिल्या जाणाऱ्या दोन दिवसाआड पाणीपुरवठ्यात कसलीही सुधारणा न करता दोन दिवसाआड पाणी तेही दोन तास एवढाच वेळ दिले जाते. पाणीपुरवठ्याच्या फोर्समध्ये थोडी सुधारणा झाली असली तरी चौथा मजल्यावर पाणी फोर्सने चढेल, असे सांगण्यात आले असले तरी ते मात्र शक्य नाही. मध्यंतरी नळांना मीटर बसवून 24 तास नळांना पाणी दिले जाईल अशी देखील घोषणा करण्यात आली होती. तथापि ती घोषणा फक्त कागदावरच राहिली. नळांना मीटर बसवून 24 तास पाणी आणण्याची योजना थंडबस्त्यात पडून असल्याचे दिसून येते. लोकनियुक्त प्रतिनिधींचे प्रशासन असो अथवा आता प्रशासकीय राजवर असलेली राजवट असो पाणीपुरवठ्यात मात्र सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हा पाण्याचा मुद्दा कळीचा मुद्दा ठरू शकतो. तसेच जळगाव शहरातील रस्ते अद्याप निम्म्यापेक्षा जास्त झालेलेच नाहीत. ह्या रस्त्यांचा मुद्दा निवडणूक लढविणाऱ्या लोकप्रतिनिधींना घाम फोडेल यात शंका नाही.
जळगाव शहर वासियांमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात फार मोठी धुसफुस आहे. नीट कचरा उचलला जात नाही. अनेक भागात रस्ते नाही. काही भागात गटारीही नसल्याने घाण पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. गटारी केलेल्या ठिकाणी त्यांचा दर्जा योग्य नसल्याने अनेक ठिकाणी गटारी तुंबून ते घाण पाणी रस्त्यावर येते. वर्षभरापूर्वी म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी रस्त्याच्या कामांचे उद्घाटनाचे फक्त बोर्ड लावले. अद्याप ते रस्ते झालेले नाहीत. कंत्राटदारांचे पैसे थकल्यामुळे रस्त्यांची कामे कंत्राटदार करीत नाहीत. ते पैशासाठी कोर्टात गेले आहेत. त्यामुळे जळगाव शहरातील रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. येत्या मनपा निवडणुकीत न झालेल्या रस्त्यांमुळे कुणाकुणाचे बळी घेतले जातील हे कळून येईल. त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्याचे सर्वत्र बोलले जाते आहे.
महापालिका प्रशासनावर कुणाचा वचक नाही. अतिक्रमणे वाढत आहेत. मंजूर समांतर रस्ते होत नाहीत. अतिक्रमणामुळे ते समांतर रस्ते होत नाहीत, असे सांगण्यात येते. पण अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी कुणाची? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो. महापालिका प्रशासनात सुधारणा झाली नाही, तर त्या प्रश्नांचा मुद्दा सुद्धा महापालिका निवडणुकीत अडसर ठरणार आहे. पण सध्या भाजप सत्ताधारी पक्ष आपल्या पक्षात इतर पक्षाचे लोकांचे इन्कमिंग करण्यात मशगुल आहे. त्या विरोधकांचे इनकमिंग महागात पडेल की फायद्यात होईल हे आगामी निवडणुकीत सिद्ध होणार आहे..!