जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

विधान परिषदच्या निवडणुकीसाठी उद्या गुरुवार दि. 18 जून रोजी मतदान होणार असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील 630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे सोमवार दि. 22 रोजजी स्पष्ट होणार आहे. मंगळवार दि. 16 रोजी सायंकाळी प्रचाराची सांगता झाली.
या निवडणुकीत जे मतदार पहिल्या पसंतीचे मत अगोदर देतील, त्यांचीच मतपत्रिका ग्राह्य धरली जाईल. थेट दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाही. यामुळे प्रत्येक मतदाराला पहिल्या पसंतीचे मतदान करणे अनिवार्य आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. मतदान करताना मतदान पत्रिकेवर मतदान करावे लागेल, मतदान केंद्रावर ज्या रंगाच्या शाईचा पेन असेल, तोच पेन वापरावा लागणार आहे. दुसऱ्या पेनाने मतदान केले, तर ते अवैध मतदान ठरेल. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची अधिक मते पडतील, तो विजयी होईल. पहिल्या पसंतीच्या मतांची बेरीज 316 न झाल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या मतांत ज्याला अधिक मते पडतील, तो उमेदवार विजयी होईल. तोच नियम तिसऱ्या क्रमांकाच्या मतदानासाठीही जिल्ह्यात सात मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पार पडणार असून प्रशासनाने त्याची तयार पूर्ण केली आहे. निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरूवार दि. 18 मतदान होत असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण 630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये 315 महिला आणि 315 पुरुष मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) समर्थित उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये काही दिवस राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपच्या वाट्याला जागा गेल्यानंतर शिवसेना (शिंदे गट)च्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली होती. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी मतदानाच्या काही दिवसांपूर्वीच माघार घेतल्याने महायुतीतील तणाव निवळला.
निवडणुकीपूर्वी महायुतीच्या विविध बैठका घेण्यात आल्या असून सर्व घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तथापि, प्रत्यक्ष मतदानावेळी महायुतीतील सर्व मते एकाच दिशेने पडतात का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांना आघाडीतील सर्व घटक पक्षांची मते कितपत एकत्रित मिळतात, याबाबतही उत्सुकता आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक उमेदवाराच्या मतांची आकडेवारी, विविध राजकीय गटांचा पाठिंबा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.


