जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतीसाठी आज मतदान
प्रशासनाकडून संपूर्ण तयारी : उमेदवारांचे देव पाण्यात : मतदारांनी हक्क बजवावा!
जळगाव
जिल्ह्यातील 16 नगरपालिका व 2 नगरपंचायतींसाठी उद्या मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 16 नगरपालिका व 2 नगरपंचायतींमध्ये मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी लागणारी साहित्य सामग्री, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था यांचे नियोजन जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे केले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तसेच निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज दिवसभर आढावा बैठक घेत नियोजन पूर्ण केले आहे. बुधवार दि. 3 रोजी मतमोजणी होणार असून उमेदवारांचे देव पाण्यात असून मतदारांनी आपला हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
या निवडणुकीत भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर, एरंडोल, पारोळा, यावल, रावेर, फैजपूर, मुक्ताईनगर, चोपडा, शेंदुर्णी, वरणगाव नगरपालिका व नगरपंचायतींसाठीही उद्या नागरिकांना आपल्या मताचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात मतदान केंद्रांची संख्या, मतदान कर्मचारी यांचे प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्था, र्इव्हीएम चाचणी यासह निवडणुकीसाठी आवश्यक असलेले सर्व नियोजन संध्याकाळपर्यंत प्रशासनाने पूर्ण केले. भुसावळ, अमळनेर व चाळीसगाव ही मोठी शहरे असल्याने येथे विशेष तुकड्यांची मदत प्रशासनाने तैनात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू असलेल्या निवडणूक प्रचार मोहिमेला सोमवारी रात्री प्रचार बंदी लागू झाली. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (दोन्ही गट), तसेच विविध स्थानिक पॅनेल्स आणि अपक्ष उमेदवारांनी आपापल्या ताकदीने प्रचार केला. भुसावळ, चोपडा, पाचोरा, जामनेर आणि एरंडोल या ठिकाणी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी रॅली, पदयात्रा, मतदार संपर्क, सोशल मीडिया प्रचारातून अंतिम प्रयत्न केले.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त उभारला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, राखीव तुकड्या, राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दल, तसेच महिला पोलीस अशा मोठ्या संख्येने सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही संवेदनशील केंद्रे विशेषत: रावेर, यावल, भडगाव, अमळनेर, चोपडा, मुक्ताईनगर येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काही केंद्रांवर सीसीटीव्ही, व्हिडिओ चित्रण, ड्रोन सर्वे अशा तांत्रिक उपायांचाही वापर केला जात आहे.
प्रशासनाची वाहतुकीपर्यंत व्यवस्था
प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांना आज सोमवारी मतदान केंद्रावर पोहचविण्यात आले. मतदान केंद्रांवर उद्या सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल. र्इव्हीएम मशीनची तपासणी, व्हीव्हीपॅट सेटअप, बूथ पातळीवरील यादी अद्ययावत ठेवणे, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा, रॅम्प, वाहन व्यवस्था यांचेही नियोजन करण्यात आले आहे.
शांततेत मतदान करा!
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन केले की, ‘लोकशाही मजबूत होण्यासाठी मतदान ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येकाने आपला मताचा हक्क बजावून शांततेत मतदान करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मतदान केंद्रांवर प्रशासनाने सुरक्षित वातावरण तयार केले आहे. त्याचबरोबर, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाने विविध जागरूकता मोहिमा राबवल्या आहेत. ‘माझा मत माझा हक्क’ संदेश देणारे बॅनर्स, फ्लोट्स, युवकांच्या रॅलीज, सोशल मीडिया मोहिमा यामुळे जनतेत मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात इतके होणार मतदान
निवडणूकीसाठी एकूण ५७८० निवडणूक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हयात 16 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी एकुण 967 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून जिल्हयात एकूण 8 लाख 89 हजार 914 इतके मतदार मतदानाचा हक्क् बजावणार आहे. यात पुरुष मतदारांची संख्या 4 लाख 50 हजार 893 इतकी असून महिला मतदारांची संख्या 4 लाख 38 हजार 938 इतकी आहे तर 83 इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्हयात एकुण 12 अपिल असलेल्या नपा सदस्य पदांची निवडणूक ही पुढे ढकल्याण्यात आली असून यात भुसावळ नगरपरिषदेतील 3, अमळनेर नगरपरिषदेतील 1, पाचोरा नगरपरिदेतील 2, यावल नगरपरिषेदतील 1, वरणगाव नगरपरिषेदतील 2, सावदा नगरपरिषेदतील 3 यांचा समावेश आहे.