पुतीन यांच्या दौर्यापूर्वी कच्चा तेलाच्या बाजारात घसरण
नवी दिल्ली वृत्तसंस्था रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आजपासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. या दौऱ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे महत्त्व प्राप्त झाले असून अमेरिकेसह युरोपियन देशांचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. दौऱ्यापूर्वीच जागतिक कच्चा तेल बाजार, रशिया-युक्रेन शांतता चर्चांची शक्यता आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या भूमिकेमुळे अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.
कच्च्या तेलाच्या आयातीत भारताची घट, तर भावात सलग घसरण
भारताने अलीकडे रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीत कपात केल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत. रशिया-युक्रेन शांतता चर्चांच्या अपेक्षेमुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांनी खरेदी थांबवली असून बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
ब्रेंट क्रूडचा भाव 62.32 डॉलर प्रति बॅरल (0.21% घसरण), तर अमेरिकन WTI क्रूड 58.52 डॉलर प्रति बॅरल (0.20% घसरण) इतका व्यापार करत आहे. काही दिवसांत या दरांमध्ये 1 ते 1.2 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.
रशिया–युक्रेन शांतता कराराची शक्यता
रशियन सरकारने बुधवारी माहिती दिली की, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुख्य अधिकाऱ्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिनिधींसोबत सुमारे पाच तास चर्चा झाली. तरीही शांतता विषयावर निष्कर्ष निघू शकला नाही. मात्र, पुतीन भारत दौऱ्यावर असताना या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शांतता कराराची घोषणा झाल्यास जागतिक अस्थिरता कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम कच्चा तेलाच्या किंमतींवर होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. किंमती आणखी कोसळण्याचा अंदाज आहे.
डॉलरऐवजी पर्यायी चलनाचा विचार
रशियाकडून तेल खरेदीसाठी भारताने आधी डॉलर, नंतर रियाल आणि चीनच्या चलनातील व्यवहार स्वीकारले. डॉलर-रुपया विनिमय दरातील तफावत आणि अमेरिकेकडून वाढता दबाव पाहता, तेल खरेदीसाठी आता इतर स्थिर चलन वापरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
रशियन तेलामुळे 17 अब्ज डॉलरची बचत; मात्र अमेरिकेचा टॅरिफचा फटका
एप्रिल 2022 ते जून 2025 या कालावधीत भारताने दररोज 17–19 लाख बॅरल रशियन कच्चे तेल खरेदी केले आणि तब्बल 17 अब्ज डॉलरची बचत साधली. भारतीय कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा झाला.
मात्र या खरेदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लागू केले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या टॅरिफमुळे भारतीय निर्यातीला जवळपास 37 अब्ज डॉलरचे नुकसान, तर GDP वृद्धी दरात 1% घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.