
लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे गावातील एका लग्नसोहळ्यात जेवण वाढण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून मेहुणबारे पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरपोळे येथे मोठ्या उत्साहात लग्नसोहळा सुरू असताना जेवणावळीच्या वेळी काही पाहुण्यांनी “आमच्या लोकांना जेवण का वाढले जात नाही?” असा प्रश्न उपस्थित केला. यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. सुरुवातीला बाचाबाचीपुरता मर्यादित असलेला हा वाद काही वेळातच चिघळला आणि शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच मारहाणीपर्यंत पोहोचला.
हाणामारीदरम्यान एका व्यक्तीच्या डोक्यात लाकडी काठीने जोरदार प्रहार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. लग्नमंडपात अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. सरदार झबुलाल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

