चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

भद्रावतीत सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी मौजा वडाळा (रिठ) व मांगली पांदन रस्त्यावर शेतकरी व ग्रामस्थांशी सखोल चर्चा केली. भूअभिलेख विभाग, महसूल आणि विकास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह झालेल्या या चर्चेत गावातील अतिक्रमित रस्त्यांचे मोकळीकरण आणि स्थानिक समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
भूअभिलेख विभागाने अतिक्रमित रस्त्यावरील कारवाई तसेच स्मशानभूमीशी संबंधित अडचणींवर देखील चर्चा केली. सेवा पंधरवाडा अभियानाच्या अंतर्गत गावागावात शिवार फेर्यांचे आयोजन करून विविध समस्यांचे संग्रह करीत त्या सोडविण्यासाठी नियोजन करत असल्याचे समोर आले. या माध्यमातून प्रशासन आणि लोकांमध्ये संवाद वाढून गावातील विकासाला चालना मिळत आहे.
भद्रावती तहसीलमध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राज्यभर राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवाडा मोहिमेअंतर्गत, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्याचे उद्दिष्ट साधले आहे.
या दौऱ्यास भूअभिलेख विभागाचे अधीक्षक प्रदीप जगताप, तहसीलदार राजेश भांडारकर, उपाधीक्षक पारधी, खंड विकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व मोजक्या अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून अतिक्रमित रस्त्यांचे मोकळीकरण व गावातील विविध प्रशासनिक अडचणींची माहीती घेतली.
या चर्चेत शेतकऱ्यांनी रस्त्यांव्यतिरिक्त पाणसंपदा, शेतीसंबंधी अडचणी, वसाहतींचे व्यवस्थापन यावर देखील आपली मते मांडली. प्रशासनाकडून या समस्या सोडवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यास आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय स्मशानभूमींचा अतिक्रमण आणि स्वच्छताविषयक समस्या यावरही संवाद करण्यात आला.
पूर्वी गावोगावी होणाऱ्या अतिक्रमित रस्ता मुक्ती मोहीमांना गतिमान स्वरूप देत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गावातील लोकशाही सहभागाला चालना दिली आहे. सेवा पंधरवाडा मोहिमेचा एक महत्वाचा भाग म्हणजे भूअभिलेख, महसूल आणि विकास यंत्रणेमध्ये समन्वय वाढविणे, ज्यामुळे अडचणींचा वेळीच निराकरण करता येणारा असतो.
याव्यतिरिक्त, आदिकर्मयोगी अभियानाअंतर्गत गावस्तरावरील शिवार फेर्यांचे आयोजन सुरू असून, त्या माध्यमातून प्रत्येक गावातील शेतीसंदर्भातील माहिती संकलित करून प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. शेतकरी, कारागीर, महिला गट यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेणं व त्या अनुषंगाने धोरण आखणं या मोहिमेचा उद्धेश आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकास अधिक प्रभावी व पारदर्शक होत असून शेतकरी वर्गाला नवीन कल्याणकारी योजना व सुविधा उपलब्ध होण्यास मदत होत आहे.
भद्रावतीतील सेवा पंधरवाडा अभियानाने स्थानिक शेतकरी, नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा यामध्ये एका नव्या संवादाचे पर्याय उभे केले आहेत. आगामी काळातही अशा चर्चात्मक व सहभागी पद्धतीने ग्रामिण विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा येथील सुध्न नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


