चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा गावात प्रस्तावित देशी दारू दुकानावरून वातावरण चांगलेच तापले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. नागरी वस्तीमध्ये देशी दारू दुकान सुरू करण्याच्या हालचालींविरोधात ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात धडक देत जोरदार निवेदन सादर केले.
मयूर राजू विरुटकर यांच्या नेतृत्वाखाली समस्त ग्रामस्थांनी प्रशासनासमोर ठाम भूमिका घेत “गावात दारू दुकान नकोच” असा एकमुखी निर्धार व्यक्त केला. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या आदेशानुसार बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथील देशी दारू दुकान (सीएल-२) टेमुर्डा गावातील नागरी वस्तीमध्ये स्थलांतरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ज्या परिसरात दारू दुकान प्रस्तावित आहे, त्या ठिकाणी शाळा, ग्रामीण रुग्णालय, तलाठी कार्यालय, खासगी दवाखाने, मंदिर तसेच आठवडी बाजार भरतो. महिला व लहान मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या संवेदनशील परिसरात दारू दुकान सुरू झाल्यास गंभीर सामाजिक परिणाम होतील, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामसभेत यापूर्वीच दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आलेला नसतानाही ग्रामपंचायत आणि नागरिकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. “दारू दुकान सुरू झाल्यास गावात भांडणे, गोंधळ, महिलांना त्रास, युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे अपरिहार्य आहे,” असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी प्रशासनाने तातडीने स्थळ पाहणी करून संबंधित प्रस्ताव रद्द करावा, तसेच पोलीस विभागाने गावातील परिस्थितीचा सखोल अहवाल तयार करून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, आंदोलनात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. “गाव उद्ध्वस्त करणारा निर्णय प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. टेमुर्डा गावातील वाढता विरोध पाहता प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.


