गाव सेवा समिती गनिमी काव्याने करणार आंदोलन!
पठाणकोट एक्सप्रेसच्या थांब्याच्या मागणीकडे दुर्लक्ष भोवणार
निंभोरा, ता.रावेर : येथे पठाणकोट एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत व्हावा या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष चालवले असल्याने निंभोरा व परिसर गाव सेवा समिती रेल रोको व जेलभरो आंदोलन उघड जाहीर केलेल्या 26 जानेवारी या दिवशी न करता अत्यंत छुप्या पद्धतीने व गनिमी काव्याने तारीख न सांगता अचानक करणार असल्याचे आंदोलन प्रमुख आणि येथील माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांनी ठरवले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरू असलेल्या पठाणकोटला निंभोरा रेल्वे स्टेशनवर असलेला थांबा अचानक रद्द झाल्याने प्रभावित झालेल्या प्रवासी, व्यापारी व सर्वच घटकांनी एकत्र येऊन टप्प्याटप्याने आक्रोश आंदोलन चालवले असून गेल्या 3 जानेवारी रोजी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून निंभोरा रेल्वे स्टेशन भागात पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलनाची दिशा ठरवणारी एल्गार सभा घेण्यात आली होती. या सभेत ठरल्याप्रमाणे निंभोरा पंचक्रोशीतून पठाणकोठला थांबा मिळावा या मागणी निवेदनासाठी पाच हजार सह्यांची मोहीम सुद्धा दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात आली होती. दरम्यान, एल्गार सभेला रेल्वेच्या गोपनीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आंदोलनाच्या मागणीबाबत सविस्तर अहवाल रेल्वे प्रशासनाला दिला होता. निंभोरा पोलिसांनी सुद्धा पोलीस खात्याच्या वरिष्ठ स्तरावर नियोजित आंदोलनाची माहिती पोहचवली असतांना मागणी मान्य न झाल्याने निंभोरा गाव व परिसर सेवा समिती गनिमी काव्याने तारीख जाहीर न करता अचानक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे.
तोपर्यंत जामीन न घेण्याचे आंदोलन
निंभोरा येथे पठाणकोट गाडीला थांबा मिळावा म्हणून तारीख जाहीर न करता ‘रेलरोको व जेलभरो’ करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर, आपले गाई -म्हशी आणि गुरे -बकऱ्या घेऊन रेल्वे मार्गांवर उतरतील. सर्व प्रभावित परिसरातील लोक स्वतः अटक करून घेतील आणि जोपर्यंत थांबा जाहीर होत नाही तोपर्यंत रेल्वे जेलमध्येच राहून जामीन घेतला जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांची राहील.
डीआरएम कार्यालयाबाहेर आज आंदोलन
रेल्वे प्रशासनाने निंभोरा परिसर गाव सेवा समितीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आमदार-खासदार आणि रेल्वे प्रशासनाला मागणी करूनही दखल होत नसल्याने लोकांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेता उद्या शनिवार, 24 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता डीआरएम कार्यालायबाहेर मागणी आंदोलन करण्यात येणार आहे. निंभोरा व पंचक्रोशीतील त्रस्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विवेक ठाकरे व निंभोरा गाव व परिसर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.