वीजबिले न भरणाऱ्या कृषिपंपधारकांकडे १९२ कोटींची थकबाकी

0

महा कृषी ऊर्जा अभियानात ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात वर्षानुवर्षे वीजबिल न भरणाऱ्या साडेसात अश्वशक्तीहून अधिक विद्युतभार असलेल्या तब्बल साडेसव्वीस हजार कृषिपंपधारकांकडे १९२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या कृषिपंपधारकांसह जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत महा कृषी ऊर्जा अभियानात थकबाकी भरून ३० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते बदलण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. तरीही कृषिपंपाचे वीजबिल भरण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे साडेसात अश्वशक्तीपेक्षा अधिक विद्युतभार असलेल्या जिल्ह्यातील २६ हजार ५३४ ग्राहकांकडे १९२ कोटी रुपये थकबाकी आहे. यात ५ ते १० वर्षे बिल न भरलेले १४ हजार ९३९ ग्राहक, १० ते १५ वर्षे बिल न भरलेले ५०३६ ग्राहक व १५ वर्षाहून अधिक काळ एकही बिल भरलेले ६ हजार ५५९ ग्राहक आहेत. अशावेळी महावितरण विजेचे नियोजन कसे करणार यावर थकबाकीदार शेतकऱ्यांनी विचार करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण वीज निर्मिती करत नाही, तर विविध स्रोतांकडून दरमहा वीज विकत घेऊन ती वीज आपल्या ग्राहकांना वितरीत करीत असते. असे असताना महावितरणच्या सर्वच वर्गवारीतील ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणे गरजेचे आहे. परंतु शेतीसाठी सवलतीचा वीजदर असतानाही शेतकरी बांधव वीजबिल भरण्याला प्रतिसाद देत नसल्याची परिस्थिती आहे. सध्या महावितरणची राज्यात ५० हजार कोटीपेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीत आणखी वाढ होणे हे महावितरणच्या अस्तित्वासाठी धोक्याची बाब असल्याचे स्पष्ट होते.

महावितरण ग्राहक सेवेसाठी बांधिल आहे. महावितरणच्या एकूण महसुलापैकी ८५ टक्के खर्च हा वीजखरेदीवर होत असतो आणि उर्वरित १५ टक्क्यात घेतलेल्या कर्जावरील व्याज, देखभाल-दुरूस्ती आणि इतर प्रशासकीय खर्च करण्यात येतो. कृषी क्षेत्राची दिवसेंदिवस वाढत असलेली थकबाकी हा महावितरणचा चिंतेचा विषय बनलेला असून महावितरणच्या मुख्यालयाने याची नुकतीच गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे थकबाकीचा ग्राहकसेवेवर परिणाम होऊ नये याचा शेतकरी ग्राहकांनी देखील विचार करून थकीत वीजबिल भरून सहकार्य करावे.

मार्चपर्यंत ३० टक्के सवलतीचा लाभ घ्या
दरम्यान, महावितरणतर्फे २०२१ पासून महा कृषी ऊर्जा अभियान राबवले जात असून, जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत यावर ५० टक्के सूट देण्यात आलेली होती. दरम्यान, ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या कृषीपंप ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येत असून, विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे महावितरणने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.