जिल्ह्यात प्रचार शिगेला : उमेदवारांची मात्र दमछाक..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. तीन दिवसानंतर जाहीर प्रचार थांबेल महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा २०२४ विधानसभा निवडणूक ही आगळीवेगळी ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात खरी चुरस आहे, असे वाटत असले तरी पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्यानेही धुमाकूळ घातला आहे. महायुतीतील घटक पक्ष भाजप शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील बंडखोरीवर सोयीस्कर रित्या पक्षातर्फे कारवाईचे नाट्य केले गेले. तीच परिस्थिती महाविकास आघाडीतील घटक पक्षातर्फे करण्यात आली असल्याने अपक्ष उमेदवारांना पक्षातर्फे अभयच मिळालेले आहे.

अपक्षाच्या भाऊगर्दीमुळे आजमितीला नेमकी मतदारसंघातील स्थिती कळायला मार्ग नाही. जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असून घरोघरी जाऊन प्रचारात भर दिला जातो आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराकडून ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून “मी अमुक पक्षाचा उमेदवार.. माझी निशाणी अमुक असून, येत्या २० तारखेला माझ्या नावासमोरील निशाणीचे बटन दाबून प्रचंड मतांनी मला मतदान करून विजयी करा..” अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप दिवसभरातून व्हायरल होत आहेत. यंदाच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी सोशल मीडिया या प्रसारमाध्यमाचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर सुयोग्य केलेला वापर होय. उमेदवारावर मतदार संघात जेथे जेथे प्रचाराला जातो त्याचे प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रण लगेच थेट व्हायरल केले जात आहे. त्यामुळे दिवसभरात जिथे जिथे प्रचाराला गेले त्याचा व्हिडिओ वृत्तांत व्हायरल होत आहे.

मोठमोठ्या नेत्यांच्या जाहीर सभांची एक एक फेरी होऊन गेली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात, खासदार अमोल कोल्हे, संजय राऊत, सुषमा अंधारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींच्या जिल्हाभरात जाहीर सभा झाल्या. प्रत्येक नेत्याच्या जाहीर सभेला प्रचंड अशी गर्दी होती. ही गर्दी उत्स्फूर्त होती, आणि या गर्दीचे स्वरूपांतर मतदानात होईल की नाही? हे मतदान झाल्यानंतरच निकालावरून स्पष्ट होईल. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्व ११ उमेदवार महायुतीचे निवडून येतील असा विश्वास भाजपचे संकट मोचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला असला, तरी खुद्द गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे गिरीश महाजनांना मतदार संघात थांबून राहावे लागत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकरांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात ११ पैकी जळगाव शहर, पाचोरा-भडगाव आणि मुक्ताईनगर मतदार संघात तीन महिला उमेदवार रिंगणात उतरले असून जळगाव शहर मतदार संघात विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांच्याविरुद्ध माजी महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जयश्री महाजन या टक्कर देत असून आमदार राजू मामा भोळे विजयाची हॅट्रिक करतात, की ही हॅट्रिक जयश्री महाजनांकडून रोखली जाते? हे बघण्यासारखे आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या मतदारसंघातील शिस्तबद्ध प्रचाराने विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्यासमोर फार मोठे आव्हान उभे केले आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी खडसे या महिला उमेदवाराने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचे विरोधात मोठे आव्हान उभे केले आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघात मदत व पुनर्वसन मंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे यांनी आव्हान उभे केले आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी या दोन्ही उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र शिंदे शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील यांचे विरुद्ध महाविकास आघाडीचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सतीश पाटील यांचे तगडे आव्हान तर आहेच, त्याचबरोबर माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी भाजपशी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढवीत असल्याने शिंदे शिवसेनेचे अमोल पाटील यांना फार मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचे विरुद्ध माजी खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उन्मेष पाटील यांच्यात लढत होत असून दोन मित्रांमध्ये होणाऱ्या या लढतीमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे देखील लक्ष लागले आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे विरुद्ध माजी जिल्हा परिषद सभापती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी फार मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे सोनवणे कुटुंबियांची चोपडा मतदार संघातील हॅट्रिक रोखली जाईल, असे मतदार संघातील चित्र आहे. रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे अमोल जावळे आणि काँग्रेसचे धनंजय चौधरी यांच्यात होणाऱ्या चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांची उमेदवारी भाजप आणि काँग्रेस उमेदवाराचे भवितव्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. एकंदरीत सर्वच उमेदवारांमधील धाकधूक वाढलेली आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.