संघ ‘दक्ष’…निवडणुकीवर ‘लक्ष’!

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

विधानसभा निवडणुकीचा माहौल चांगलाच तप्त झाला आहे. हिवाळ्याचे दिवस असतांनाही वातावरण मात्र गरमागरम झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असा सरळसरळ सामना होत असला तरी बहुतांश मतदारसंघात अपक्षांनी बंडाचे निशान फडकविल्यामुळे नाही म्हटले तरी ‘काळजी’ करण्याचे कारण ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांना जोरदार फटका बसल्याने महायुती विधानसभेसाठी सावध पाऊले टाकत आहे. लोकसभेवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फारसा सक्रिय झाला नाही. त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले होते. मिशन 45 हाती घेणारी महायुती केवळ 17 वर थांबल्याने महायुतीत  चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. महाविकास आघाडीने लोकसभेत 30 जागांवर बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयशाची मरगळ दूर करीत महायुती विधानसभेसाठी सर्व ताकदीने मैदानात उतरली आहे. आता तर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी संघ अधिकच सक्रिय झाल्याने महायुतीला फायदा होर्इल हे स्पष्ट झाले आहे.

‘बटेंगे तो कटंगे’, ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ अशा घोषणा सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघाचे स्वयंसेवक बरीच मेहनत घेत आहेत. संघाच्या लोक जागरण मंचाकडून लोकांमध्ये पत्रके देखील वाटली जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून धडा घ्या आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वातील महायुतीला विजयी करा, असे आवाहन स्वयंसेवकांकडून करण्यात येत आहे. संघाशी संबंधित असलेल्या तब्बल 65 संघटना प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. संघाचे काम शिस्तीत चालत असते. निवडणुकीच्या निमित्ताने संघ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचे अतिशय शांतपणे काम सुरु आहे. व्यक्तीगत भेटीगाठींवर त्यांचा भर आहे. संविधान, आरक्षण, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्याबद्दल महाविकास आघाडीकडून केला जाणारा प्रचार खोटा आहे. त्यापासून सावध राहा, त्याला बळी पडू नका, असा मजकूर असलेली पत्रके वाटण्यात येत आहेत.

जमीन जिहाद, लव जिहाद, धर्मांतरण, दगडफेक, दंगली रोखण्याचे काम करणारे सरकार निवडा, असा प्रचार संघाकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, हा मुद्दा स्वयंसेवक दोन्ही नेत्यांचे नाव न घेता लावून धरत आहेत. संघाने राज्यभरात तब्बल सत्तर हजार लहान लहान बैठका घेण्यावर भर दिला जात आहे. नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत संघाने सोळा हजारांहून अधिक बैठका घेतल्या होत्या. त्याचा चांगला परिणाम दिसला. संघाची अदृश्य शक्ती भाजपच्या कामी आली. हातातून पूर्णपणे निसटलेली निवडणूक भाजपने संघाच्या मदतीने जिंकली. तोच कित्ता महाराष्ट्रातही संघाच्या माध्यमातून गिरविला जात असून महायुतीच्या हातची सत्ता कायम ठेवण्यासाठी संघाने पुढाकार घेतल्याचे स्पष्ट होत असले तरी महायुतीनेही सर्वसामान्य जनतेपर्यंत गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला पाहिजे. महाविकास आघाडीतील नेते काही ठिकाणी एक दिलाने काम करीत असून त्याचा फटका बसू नये यासाठी महायुतीने ताकही फुंकून घेतले पाहिजे. या निमित्ताने संघ ‘दक्ष’ झाला असून त्यांचे ‘लक्ष’ आता निवडणुकीवर केंद्रीत झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.