ईव्हीएम मतमोजणी पडताळणीतून शंकेचे निरसन होईल ?

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे निकाल अनाकलनीय, विश्वसनीय, अनपेक्षित असे लागले. महायुतीला २८८ पैकी २३५ जागांवर थम्पिंग मेजॉरिटी मिळाली. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. जळगाव जिल्ह्यातील ११ पैकी सर्व ११ जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली. विरोधी पक्ष नेता सुद्धा आता विधानसभेत राहणार नाही. ज्या पद्धतीचे निकाल लागले त्यामुळे ईव्हीएम वर आणि निवडणूक प्रक्रिये संदर्भात महाराष्ट्रभर एकच गदारोळ उठला आहे. पुणे जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघात पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी रीतसर लाखो रुपये भरून मागणी केली आहे. महाराष्ट्रातील इतर भागातील अनेक पराभूत उमेदवार फेर मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज करत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील तीन पराभूत उमेदवार अनुक्रमे मुक्ताईनगर मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी रोहिणी खडसे, पाचोरा भडगाव मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी आणि एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सतीश पाटील या तीन उमेदवारांनी ईव्हीएम मतमोजणी पडताळणीसाठी रीतसर नियमानुसार निकाल लागल्यानंतर सात दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पैसे भरून अर्ज दाखल केले आहेत. तिन्ही मतदारसंघातून मिळून एकूण २७ मतदान केंद्रांवरील मतमोजणी पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

सर्वाधिक जास्त एकूण १६ मतदार केंद्रातील ईव्हीएम मतमोजणी पडताळणीची मागणी मुक्ताईनगर मतदार संघातील पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांनी केली आहे. त्या पाठोपाठ ८ मतदार केंद्रांवरील ईव्हीएम मतमोजणी पडताळणीसाठी पाचोरा भडगाव मतदार संघातील पराभूत उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी मागणी केली आहे. तर एकूण ३ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मतमोजणी पडताळणीची मागणी एरंडोल पारोळा भडगाव मतदार संघातील पराभूत उमेदवार डॉक्टर सतीश पाटील यांनी केली आहे. हे तिघेही पराभूत उमेदवार दुसऱ्या क्रमांकाचे पराभूत उमेदवार आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या पराभूत उमेदवारांना ईव्हीएम मतमोजणी पडताळणीची नियमानुसार मागणी करता येते. १६ मतदार मतदान केंद्रावरील ईव्हीएम मतमोजणी पडताळणी एकूण ७ लाख ५५ हजार २०० रुपये रोहिणी खडसे यांनी तर ३ मतदान केंद्रातील ईव्हीएम मतमोजणी पडताळणीसाठी पराभूत उमेदवार डॉक्टर सतीश पाटील यांनी १ लाख ४१ हजार ६०० रुपये भरले आहेत. असे तीन उमेदवारांचे एकूण १२ लाख ७४ हजार ४०० रुपये ही अशी एकूण रक्कम भरली आहे. या तिघांचे अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारले असून राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आणि दिलेल्या तारखेला त्यांची मतमोजणी पडताळणी होणार आहे.

ईव्हीएम मतमोजणी पडताळणीची मागणी करणारे तिन्ही पराभूत उमेदवार दुसऱ्या क्रमांकाने पराभूत झालेले आहेत. रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतदानामुळे पराभवाचा फटका बसला असे जर या पराभूत उमेदवारांना वाटत असेल, तर ईव्हीएम मतमोजणी पडताळणी ही एक टेस्ट केस असेल. जर निर्दोष पणे निवडणूक प्रक्रिया झाली असेल तर तज्ञ अभियंते यांच्यासमोर आणि पराभूत उमेदवारांच्या उपस्थिती पडताळणी होणार आहे. या पडताळणी मधून जर दोष आढळला अथवा प्रत्यक्ष मतमोजणी आणि मिळालेल्या मतांमध्ये तफावत आढळली तर निवडणूक प्रक्रियेला दोषी ठरवले जाण्याची शक्यता आहे. तथापि होणारी मतमोजणी पडताळणी केव्हा होईल? हे सांगता येणार नाही. त्याला बराच कालावधीत जाऊ शकतो. ‘तारीख पे तारीख’ जर होत असेल तर त्याला काही अर्थच नाही. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात काहूर माजलेले आहे.

पुराव्यानिशी काही गोष्टी सादर केल्या आणि मागणीच्या अधिकारात निवडणूक आयोगाकडून माहिती मागितली, तर न्याय मिळण्याची आशा असल्याचे तज्ञ तसेच वकील मंडळी सांगतात. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सदोष निवडणूक प्रक्रियेविषयी आणि निवडणुकीत झालेल्या पैशाचा वारेमात वापर याच्या निषेधार्थ तीन दिवसाचे आत्मक्लेष उपोषण केले. त्यानंतर सर्वच विरोधी पक्षाच्या वतीने बाबा आढाव यांच्या आंदोलना पाठिंबा जाहीर करून महाराष्ट्रभर ईव्हीएम च्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन पराभूत उमेदवारांनी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मतमोजणी पडताळणीची मागणी केली आहे. त्यातून काय निष्पन्न होईल? हे दिसून येईल. तथापि न्याय मिळेलच हे हमखास सांगता येणार नाही. तसेच मनातील शंका दूर करण्याच्या दृष्टीने या तिन्ही पराभूत उमेदवारांनी ‘किस्मत मोजणी पडताळणी’ची मागणी केल्याबद्दल त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो…!

Leave A Reply

Your email address will not be published.