दुपारपर्यंत धीमे मतदान दुपारनंतर लागल्या रांगा

0

लोकशाही संपादकीय लेख 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यातील २८८ मतदार संघात एकाच वेळी सकाळी सात वाजेपासून मतदान झाले. सकाळी सात ते अकरा दरम्यान जळगाव जिल्ह्यात मतदान अत्यंत कमी झाले. दुपारी चार वाजेपर्यंत धीमे गतीने मतदान झाले. चार नंतर मात्र मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगाच रांगा लागल्या. काही मतदान केंद्रांवर वेळ संपली असतानाही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा असल्याने मतदान चालू होते. सकाळी सात ते दुपारी पाच वाजेपर्यंत जळगाव शहरासह जिल्ह्यात एकूण सरासरी 54.69% इतके मतदान झाले होते. अंतिम मतदानाची टक्केवारी हा अग्रलेख लिहून होईपर्यंत आलेली नव्हती.

सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत जिल्ह्यातील मतदार संघ निहाय मतदानाची टक्केवारी मध्ये अंमळनेर 55.10% भुसावळ 52.44 %, जळगाव 56.55%, चोपडा 52.13%, एरंडोल 58.36%, जळगाव शहर 45.11%, जळगाव ग्रामीण 60.77%, जामनेर 57.34%, मुक्ताईनगर 59.69%, पाचोरा 46.10% आणि रावेर 62.50% इतके मतदान झाले होते. यामध्ये जळगाव शहरात सर्वाधिक कमी 45.11% तर सर्वाधिक जास्त 62.50% इतके मतदान रावेर मतदार संघात झाले. याचा अर्थ जळगाव शहरात दुपारी पाच वाजेपर्यंत मतदारांमध्ये उत्साह नव्हता हे स्पष्ट दिसून येते. त्यानंतर मात्र जळगाव शहरातील मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या. हे कशाचे द्योतक आहे.? त्याचबरोबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या पूर्वसंध्येपासून ते मतदानाच्या दिवशी ज्या घटना घडल्या त्या पाहिल्या की एक वेगळेपण आणि आरोप प्रत्यारोपाने गाजला, असे म्हणायला हरकत नाही. पाचोरा भडगाव मतदार संघात प्रमुख चौरंगी लढतीत अपक्ष उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत निवडणुकीत कसलीही तडजोड न करता निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आणि मध्यरात्री नंतर बॅक फुटवर गेल्याचे स्पष्ट दिसून आले. त्याचा फायदा कोणाला मिळतो हे आता २३ तारखेला मतमोजणीच्या दिवशीच कळून येईल. अपक्ष उमेदवार दिलीप वाघ बॅक फुटवर गेले असले तरी त्यांचे सहकारी कार्यकर्ते मात्र दुसऱ्याच उमेदवाराशी हात मिळवणी केल्याचा आरोप होतो आहे. असा प्रचार आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीत पाहायला मिळालेला नाही. तथापि यात निवडणुकीत हा प्रचार झाल्याने निवडणुकीचा स्तर घसरल्याचे स्पष्ट दिसून आले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीत मतदानाच्या पूर्वसंध्येपासूनच पैशाचा महापूर आला असल्याचे सर्वत्र तक्रारी येत आहेत. मतदारांना साड्या वाटपापासून ते भांडे वाटप, प्रेशर कुकर, गिफ्ट आदी देण्यामागे प्रचार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मतदानाचा आदल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून निवडणूक आयोगाने मुंबईतील एका हॉटेल मधून ०९ लाख ५९ हजार इतकी रोख रक्कम जप्त केली. त्यासंदर्भात पोलिसात गुन्हाही दाखल केला आहे. झाला आहे. विनोद तावडे यांच्याकडील ०९ लाख ५९ हजाराची रोकड अधिकृत दाखवली असली, तरी कोट्यावधींची रक्कम तेथे होती असा विरोधकांकडून आरोप केला जातो आहे. सत्ताधारी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून अशा प्रकारची कृत्य व्हावे, हे अत्यंत लांचनास्पद आणि निषेधार्ह आहे, एवढे मात्र. निश्चित विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यापासून ते मतदान होईपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र कोट्यावधींची रोकड तसेच सोन्याचे दागिने आधी मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. अगदी निवडणूकच्या आदल्या दिवशी नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकर्त्याकडे पाच कोटी रुपये सापडले आणि ते जप्त केले गेले. हे कशाचे दोतक आहे? जप्त केलेली कोट्यावधी रुपये आले कोठून? ते पैसे कोणाचे? हे मात्र अद्याप निवडणूक आयोगाकडून जाहीर झाले नाही. परंतु नेत्यांच्या बॅगा हेलिकॉप्टर मधून काढून त्या तपासण्याचे नाटक मात्र निवडणूक आयोगाने केले.

वास्तविक त्या बॅगांमध्ये काहीही सापडले नाही, हा भाग वेगळाच.. परंतु आम्ही नेत्यांच्या सुद्धा बॅगा तपासण्याचे नाटक मात्र निवडणूक आयोगाने केले, एवढे मात्र खरे. परंतु ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ असाच प्रचार म्हणता येईल. एकंदरीत दुपारपर्यंत धीमे गतीने मतदान आणि त्यानंतर मतदारांच्या लागलेल्या रांगांचा अन्वयार्थ काय? या प्रश्नाचे उत्तर त्या रांगांमध्येच दडले होते काय? त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदानाचा उत्स्फूर्त उत्साह असायला हवा होता, तो दिसला नाही, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचे निकाल चमत्कारिक लागले नाही, तरच नवल म्हणता येईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.