चारचाकी वाहन खोल भागात कोसळले : कठडे, संरक्षक भिंतीची नागरिकांची मागणी
विदगाव, ता. जळगाव
विदगाव येथे स्मशानभूमीलगत तापी नदीवरील पुलाच्या शेजारी असलेल्या खोल भागात पुन्हा एकदा चारचाकी वाहन कोसळल्याची घटना घडल्याने या ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यांच्या कालावधीत याच ठिकाणी वाहन कोसळण्याची ही दुसरी गंभीर घटना असल्याने संबंधित प्रशासनाच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विदगावकडे जाणाऱ्या तापी नदी पुलालगत रस्त्याच्या बाजूला खोल भाग असून, या ठिकाणी वाहनांना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते मजबूत सुरक्षा कठडे किंवा संरक्षक भिंत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विशेषत: रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात वाहनचालकांना या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यास थेट खोल भागात वाहन कोसळण्याचा धोका कायम आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका शिक्षक कुटुंबाची कार कोसळून गंभीर अपघात झाला होता. त्या घटनेनंतरही या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने पुन्हा एकदा चारचाकी वाहन कोसळल्याची घटना घडली आहे.

मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा कशासाठी?
एकाच ठिकाणी वारंवार वाहन कोसळण्याच्या घटना घडत असतानाही प्रशासनाकडून या धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुलाच्या शेजारील खोल भागामुळे वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. या ठिकाणी तातडीने मजबूत लोखंडी सुरक्षा कठडे, संरक्षक भिंत तसेच आवश्यक ठिकाणी दिशादर्शक व धोक्याचे फलक लावावेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज यावा यासाठी परावर्तित पट्टे किंवा पुरेशा प्रकाशाची व्यवस्थाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उपाययोजना करण्याची मागणी
पुलालगतचा धोकादायक भाग लक्षात घेता संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत तसेच इतर संबंधित प्रशासनाने संयुक्त पाहणी करून या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर केवळ तात्पुरते उपाय न करता मजबूत कठडे किंवा संरक्षक भिंत उभारण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.


