संतापलेल्या सरपंचाकडून हवेत गोळीबार : ग्रामीण भागात खळबळ
यावल शहर प्रतिनिधी
बिअर बारमधील दारू विक्रीच्या वादातून आणि तरुणांवर दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याप्रकरणी यावल तालुक्यातील कोळन्हावी गावाचा सरपंच विकास सोलंके याला पोलिसांनी अटक केली आहे. डांभुर्णी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून यावल पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सरपंचाला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विकास सोलंके हा कोळन्हावी गावाचा सरपंच असून त्याचे गावाजवळच बिअर बारचे दुकान आहे. गुरुवारी रात्री डांभुर्णी येथील काही तरुण या बिअर बारमध्ये गेले होते. तेथे बिअर बारमध्ये बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री केली जात असल्याचा आरोप करत तरुणांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. यावरून सरपंच विकास सोलंके आणि त्या तरुणांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचा राग मनात धरून आणि संबंधित तरुणांवर दहशत बसवून त्यांना घाबरवण्याच्या उद्देशाने, मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असलेल्या विकास सोलंके याने डांभुर्णी येथे जाऊन त्या तरुणांसमोर आपल्या जवळील अवैध गावठी कट्ट्यातून थेट हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी रात्रभर माग काढून शुक्रवारी पहाटेच संशयित आरोपी विकास सोलंके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस आणि गोळीबारानंतरची एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या पथकाने पोहोचून आवश्यक ते पुरावे गोळा केले आहेत. आरोपी विकास सोलंके याने त्याच्याकडील हा गावठी कट्टा सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीकडून खरेदी केला होता. हा कट्टा त्याच्यापर्यंत कसा पोहोचला आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर गावात सध्या शांतता आणि नियंत्रण असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले असून, यावल पोलीस पुढील तपास करत आहेत.



