पाण्यावर उभं असलेलं अद्भुत शहर व्हेनिस!
लाकडी खांबांवर उभारलेली वास्तुकलेची विलक्षण किमया
इटलीतील व्हेनिस (Venice) हे नाव घेताच डोळ्यांपुढे येतं ते पाण्यावर तरंगणारं, नयनरम्य आणि ऐतिहासिक सौंदर्याने नटलेलं शहर. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या शहराला “कालव्यांचं शहर” असं म्हटलं जातं. पण एक प्रश्न नेहमी पडतो — इतकं मोठं शहर पाण्यावर उभं कसं आहे?
लाखो लाकडी खांबांवर उभं आहे व्हेनिस
सुमारे 1600 वर्षांपूर्वी वसलेलं व्हेनिस हे खरं तर लाखो लाकडी खांबांवर उभं आहे. हे खांब लार्च, ओक, पाइन, स्प्रूस, एल्म आणि एल्डर झाडांच्या लाकडांपासून तयार केले गेले आहेत. प्रत्येक खांब ३.५ मीटर ते १ मीटर लांबीचा असून, हे सर्व खांब पाणथळ जमिनीत दाटीवाटीने रोवलेले आहेत.
या खांबांवर आडव्या फळ्या ठेवून, त्यावर दगडी बांधकाम करण्यात आलं. त्यामुळे व्हेनिसखाली जणू “उलटं जंगल”च उभं आहे असं म्हटलं जातं.
वास्तुकला आणि तंत्रज्ञानाचा संगम
आजच्या आधुनिक इमारती स्टील आणि काँक्रीटवर उभ्या असतात, पण व्हेनिसच्या इमारती घर्षण-आधारित तंत्रज्ञानावर उभ्या आहेत. खांब जमिनीत खोलवर रोवल्याने माती आणि लाकूड यांच्यात निर्माण झालेलं घर्षणच इमारतींना मजबुती देतं.सेंट मार्क बॅसिलिका या प्रसिद्ध इमारतीखालीच तब्बल १० हजार ओकचे खांब, तर रियाल्टो पुलाखाली १४ हजार खांब वापरले गेले आहेत.
पाण्यात असूनही लाकूड सडत नाही कसं?
शतकानुशतके पाण्याखाली असूनही हे खांब सडलेले नाहीत. यामागचं कारण म्हणजे लाकडाभोवती असलेला चिखल आणि पाणी यांचा संयोग लाकूड जपतो.ऑक्सिजनअभावी जिवाणूंचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे लाकूड कुजत नाही.पाण्यामुळे लाकडातील पेशी ओलसर राहतात आणि त्याची ताकद टिकून राहते.
इमारतीचा पाया बांधताना, लाकडी खांब प्रथम गोलाकार (स्पायरल) पद्धतीने रोवले जात.
त्यानंतर त्यावर “झत्तेरोनी” नावाच्या लाकडी फळ्या ठेवून, त्यावर दगड रचले जात.
यामुळे बांधकामाला स्थैर्य आणि दीर्घायुष्य मिळालं.
व्हेनिसच्या प्रजासत्ताकाने बांधकामासाठी लागणारं लाकूड टिकून राहावं म्हणून लवकरच सिल्व्हिकल्चर म्हणजेच वृक्षसंवर्धनाची संकल्पना राबवली. हे त्या काळातील अत्यंत दूरदृष्टीचं उदाहरण मानलं जातं.
आज जगभरात पुन्हा लाकडाच्या इमारती बांधण्याचा ट्रेंड वाढतोय. कारण लाकूड कार्बन शोषून घेतं,भूकंपप्रतिकारक आहे,आणि पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य मानलं जातं.
व्हेनिस हे केवळ पर्यटनाचं केंद्र नाही, तर प्राचीन अभियंते आणि वास्तुविशारदांच्या बुद्धिमत्तेचं जिवंत उदाहरण आहे.
ना स्टील, ना सिमेंट — फक्त लाकूड, चिखल आणि निसर्गाच्या अद्भुत संतुलनावर उभं असलेलं हे शहर आजही अभेद्यपणे टिकून आहे.