यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल पश्चिम वन विभागाच्या हरिपुरा-जामण्या राऊंड स्टाफ पथकाने दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे आडजात जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडून वाहनासह जळाऊ लाकूड असा एकूण ३ लाख ६० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पश्चिम वनक्षेत्रातून अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यावल पश्चिम वनक्षेत्रातील हरिपुरा व जामण्या येथील राऊंड स्टाफ वड्री धरण ते वड्री रस्त्याने गस्त घालत असताना त्यांना आडजात जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. वन कर्मचाऱ्यांनी सदर वाहन चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालक वाहन सोडून पसार झाला. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये आडजात जळाऊ लाकूड आढळून आले. वाहन क्रमांक एमएच १९ एस ४६९६ व जळाऊ लाकूड असा एकूण ३ लाख ६० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मुद्देमाल मु.वि. केंद्र, यावल येथे पावतीने जमा करण्यात आला.
सदर वनगुन्ह्याबाबत वर्तुळ अधिकारी हरिपुरा पूर्व यांनी प्र.री. क्र. ५/२०२६ दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केला असून पुढील तपास वनपाल हरिपुरा एस.बी. इंडे करीत आहेत. ही कारवाई सौरिष सहाय, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव, एस.ए. पाटील, सहाय्यक वनसंरक्षक, यावल प्रा. व कॅम्पा आणि वनक्षेत्रपाल पी.डी. जोशी, यावल पश्चिम यांच्या मार्गदर्शनाखाली डी.ए. परदेशी, वनपाल जामण्या, एस.एस. भोंगरे, वनरक्षक हरिपुरा पूर्व, एस.पी. भालेराव, वनरक्षक हरिपुरा, एस.बी. पाटणे, वनरक्षक, दीपक चव्हाण, वनरक्षक, राजेश बारेला, वनरक्षक, राजू तडवी, वनसेवक व शकील तडवी, वनसेवक यांनी केली.

