ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांचा हल्ला

0

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांचा हल्ला

अहिल्यानगर I लोकशाही न्यूज नेटवर्क

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर शनिवारी (दि. २७) सकाळी अरणगावजवळ अज्ञात तरुणांनी काठ्यांनी हल्ला केला. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर-दौंड महामार्गावरून जात असताना अज्ञात तरुणांनी हाके यांच्या गाडीला अडवून काठ्यांनी मारहाण केली. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, हाके यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “मी प्रामाणिकपणे ओबीसी हक्कांसाठी लढत आहे. भटके-विमुक्त समाजाला जोडत गेलो, लाखो लोकांना एकत्र केले, पण शत्रूंची संख्या सुद्धा वाढत गेली. हल्ले सहन केले, पण आता सहनशक्ती संपत चालली आहे.”

हाके यांनी यापूर्वीच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण आहे, त्यांना ओबीसी प्रवर्गात सामावून घेणे अन्यायकारक असल्याचे आक्रमकपणे मांडले होते. या भूमिकेनंतर त्यांना धमक्या मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.