जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली असल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. फुलबाजारात झेंडू वगळता अन्य सर्व फुलांची आवक जावक कायम आहे. आवक कमी असल्याने झेंडूच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक जास्त होत असल्याने सर्व प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात फळभाज्या वीस रुपयांना पावशेर; तसेच सर्व पालेभाज्यांची जुडी वीस रुपये या दराने विकली जात आहे.
राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून फळभाज्यांची आवक होत असते. अपेक्षित मागणी नसल्याने आले, लसूण, काकडी, शिमला मिरची आणि मटारच्या दरांत घसरण झाली. बाजारात हिरवी मिरची, कोबी, घेवडा आणि पावटा, शेवगा, गाजर, भुईमुग शेंग, मटार, तोतापुरी कैरी, भेंडी, गवार यांची मोठी आवक सुरु झाल्याने दरात मोठी घसरण सुरु झाली आहे. फ्लॉवर, शिमला मिरची, तांबडा भोपळा, कांदा, बटाटा यांचीही आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परराज्यातून शहरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला येत असल्याने दर कोसळल्याचे सांगितले जात आहे. मार्केटमध्ये करडई, अंबाडी, पालकच्या दरात घट झाली. कोथिंबीर आणि चवळीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. मेथी, शेपू, कांदापात, पुदिना, मुळा, राजगिरा, चुका आणि हरभरागड्डीचे दर मात्र स्थिर आहेत.
असे आहेत शेकडा दर
कोथिंबीर : 400-800, मेथी : 600-1000, शेपू : 500-800, कांदापात : 800-1000, चाकवत : 400-700, करडई : 300-600, पुदिना : 300-600, अंबाडी : 300-500, मुळा : 600-1000, राजगिरा : 400- 600, चुका : 500-800, चवळई : 300-600, पालक : 500-800. हरभरागड्डी : 500-1000 रुपये.
लिंबाच्या दरांत घसरण
मार्केट यार्डातील फळबाजारात बोरे आणि पपईच्या दरात वाढ झाली. तर, लिंबाच्या दरांत घसरण झाली. अननस, संत्री, मोसंबी, कलिंगड, खरबूज, चिकू, पेरूचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांना महागाईचा सुगंध
झेंडू : 30-50, गुलछडी : 60-100, ॲस्टर : जुडी 8-12, सुट्टा 50-70, कापरी : 10-40, शेवंती : 50-100, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 20-30, गुलछडी काडी : 20-60, डच गुलाब (20 नग): 150-250, जर्बेरा : 30-50, कार्नेशियन : 150-250, शेवंती काडी 150-250, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्किड 400-600, ग्लॅडिओ (10 काड्या): 50-70, जिप्सोफिला : 60-120 रुपये.