एक लाख तरुणांचे नोकरीचे स्वप्न भंगले

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला राज्यात मोठा धक्का देण्यात आला असून महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला 1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला हलवण्यात आला आहे. दरम्यान या प्लांटमधून महाराष्ट्रातील थेट एक लाख कुशल तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे स्वप्न भंग पावले.

गुजरातमध्ये वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या अधिकृत घोषणेवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, हा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रात आणण्यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मी अनेक बैठका घेतल्या होत्या. हा प्लांट महाराष्ट्रात उभारण्याचे जवळपास ठरले होते. यामुळेच आमच्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने याचे श्रेय घेण्यास सुरुवात केली होती.

आदित्य ठाकरे म्हणाले, माविआ सरकारच्या काळात महाराष्ट्राला देशातील आघाडीचे राज्य बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु नवीन सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास करण्याचा इरादा आणि वचनबद्धता नसल्यामुळे वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये गेला आहे.

वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अग्रवाल यांनी ट्विट केले की, वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. या प्लांटच्या माध्यमातून वेदांत समूह गुजरातमध्ये 1.54 लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली बनण्याचे भारताचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, या प्लांटच्या स्थापनेमुळे भारताची प्रतिमा सेमीकंडक्टर चिप टेकर ते चिप मेकर अशी बदलेल. या प्लांटमधून थेट एक लाख कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गुजरातमध्ये निर्माण होणाऱ्या या नवीन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्राचा फायदा देशातील सर्व राज्यांना होणार आहे.

वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्राबाहेर हलवल्याबद्दल शिवसेनेचे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. अहिर म्हणाले, पहिल्या बुलेट ट्रेनचे मुख्यालयही याच पद्धतीने मुंबईहून अहमदाबादला हलवले. त्याआधी एअर इंडियाचे मुख्यालयही मुंबईतून हलवण्यात आले होते. कोविड महामारीच्या काळातही केंद्र सरकारने महाराष्ट्राशी भेदभाव केला होता.

सचिन अहिर म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार एकीकडे मराठीप्रेम दाखवत आहे आणि दुसरीकडे महत्त्वाची उद्योग गुजरातला हलवत आहेत. यावरून शिंदे-फडणवीस यांना केवळ महापालिकांची सत्ता हवी आहे, हे सिद्ध होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, उद्योगमंत्री महाराष्ट्रात मोठे प्रकल्प आणण्याऐवजी राजकीय विरोधकांवर टिका करण्यात व्यस्त आहेत. वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रात उभारला असता तर राज्यातील सुमारे एक लाख तरुणांना रोजगार मिळाला असता.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच हे लक्षणं महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असेही ते म्हणाले.

“वेदांताचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरे यांनी ट्वीट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ”फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.

Leave A Reply

Your email address will not be published.