आज वसुबारस..! जाणून घ्या महत्व

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवाळीचा  (Diwali) पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटानंतर यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त जल्लोषात साजर होणार आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच दिवाळीला सुरुवात होते. या वसुबरारसेचे महत्व जाणून घेऊया.

दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. तिच्‍याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस (Vasubaras) या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते.

गाई-गुरांबद्दल कृतज्ञता

आज गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरु यांची पूजा केली जाते. आश्‍विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.

वासरु असलेल्या गायीची पूजा 

वसुबारसच्या दिवसापासून घरोघरी अंगणात  रांगोळी काढली जाते. आज तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरु असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

स्त्रिया उपवास करतात

या दिवशी काही स्त्रियांचा उपवास असतो. घरातील गाय वासरांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते. त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार, गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावं, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावं आणि सुख लाभावं म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.