जळगाव : गेल्या आठ-दहा दिवसांपासून वरुणराजाने जिल्ह्यात दडी मारल्यामुळे पिके ऑक्सिजनवर असून पिकांची पाण्यासाठी वाताहत सुरु आहे. पाऊस नसल्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला असून सर्वांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कापूस, केळी, सोयाबीन, मका, तूर यांची पेरणी करण्यात आली असून हे सर्व पिके पाण्यासाठी व्याकूळ झालेले आहेत. आषाढी एकादशीनंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस न झाल्याने बळीराजा अधिकच चिंतेत सापडला आहे.
वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. पावसाच्या प्रतिक्षेत असलेली शेतातील पिके आता ऑक्सिजनवर आली असून त्यांचे जगणे अवघड झाले आहे. कधी एकदा पाऊस पडतो याकडे सर्वांची नजर लागली आहे. सुरुवातीस समाधानकारक पावसामुळे बळीराजामध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र, आषाढी एकादशीनंतर अचानक पावसाने गायब होऊन जिल्ह्यात कोरडे वातावरण निर्माण केले आहे. परिणामी, पिकांची वाढ खुंटली असून ती सुकायला सुरुवात झाली आहे. खास करून कापसाचे कोवळे रोप उष्णतेमुळे मुळासकट सुकत आहेत. सोयाबीनचे पानेही वाळू लागले आहेत. केळीच्या बागांमध्ये पाने कोमेजली असून उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मका आणि तुरीच्या पिकांनाही पाण्याची तीव्र गरज असून जमिनीत ओल राहिलेली नाही. हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा ठोस अंदाज देण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. या संकटात शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेती वाचवण्याची आशा फक्त वरुणराजावर आहे. लवकरात लवकर पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणावर पीक नुकसानीची शक्यता आहे.
शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण
पावसाची मोठी अपेक्षा ठेवून बळीराजाने शेतात खते, बियाणे, औषधे यावर मोठा खर्च केला. मात्र, पाऊसच गायब झाल्यामुळे त्याच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी शेतकरी विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्यावर पीक वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सततची उन्हाची तीव्रता आणि पाण्याची कमतरता हे मोठे संकट ठरत आहे. वरुणराजाच्या दडीमुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण तयार होत आहे.