वरणगावकर विद्यालयाच्या अतिक्रमणाचे कोडे कायम, प्रशासनाचे अभय !

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील किसन नगर भागातील सरलाताई वरणगावकर विद्यालयाने ग्रा. पं. च्या ओपन स्पेस (खुली जागा) वर अतिक्रमण केल्याची बाब समोर येताच याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले. परंतु या अतिक्रमणाचे कोडे उलगडण्याऐवजी कायम आहे. विद्यालय व्यवस्थापन ओपन स्पेसवर मालकी हक्क दाखवित असली तरी याबाबत स्पष्ट खुलासा करीत नाही तर घाटपुरी ग्रा. पं. चे पदाधिकारी सुध्दा या अतिक्रमणाबाबत किंवा जागेबाबत स्पष्टपणे सांगण्यास टाळाटाळ करीत आहेत. एकंदरीत या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमणाला अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे.

सरलाताई वरणगावकर विद्यालयाने शाळेसमोरील ग्रा. पं. च्या खुल्या जागेवर मागील अनेक वर्षापासुन अतिक्रमण केले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना या अतिक्रमणाचा त्रास होत आहे. याबाबत काहींनी यापुर्वी तक्रारीही केल्या. परंतु वरणगावकर परिवाराचा महसुल प्रशासनात दबदबा असल्याने तक्रारींची बोळवण केल्याचे बोलल्या जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरुन दि. 18.11.2022 रोजीच्या लोकशाही अंकात वृत्तही प्रसिध्द करण्यात आले. सदर वृत्त प्रकाशित होताच खळबळ माजली खरी पण तेवढ्यापुरतीच. प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली गेली नसल्याचे दिसुन येते. मात्र नागरिकांमध्ये व ग्रा. पं. सदस्यांमध्ये चर्चांना उत आला आहे.

सदर खुली जागा ग्रामपंचायतीची असुन विद्यालय स्थापन झाल्यापासुन तत्कालीन ग्राम पंचायत पदाधिकारी व सदस्यांना हाताशी धरुन अतिक्रमण करण्यात आले आहे. कोणी म्हणते ग्रा. पं. ने सदर जागा लिजवर दिली आहे. तर कोणी म्हणते ग्रा. पं. ला खुली जागा लिजवर देता येत नाही. अशा एक ना अनेक चर्चा झडत असल्याने यामध्ये अनेकांचे हात ओले झाले असल्याचे दिसुन येत आहे. एकीकडे ग्राम पंचायत ई क्लास जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावत आहे. मात्र विद्यालयाच्या अतिक्रमणाबाबत काही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रशासनाविषयी तर बोलायलाच नको?

सदर विद्यालयाशी संबंधीत विनय वरणगावकर हे साहित्यीक असून त्यांनी लिहलेले “खामगावचे ठासेठुसे” पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. आता विद्यालयाच्या अतिक्रमणाबाबत या पुस्तकात कुठे काही उल्लेख आढळतो काय? हे बघावे लागेल तुर्त एवढेच.

Leave A Reply

Your email address will not be published.