वरणगावजवळ ट्रक चालकाला लुटणारी टोळी गजाआड
वरणगाव (ता. भुसावळ): राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीला वरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही घटना २० मार्चच्या रात्री ११.३० वाजता घडली.
पाचोरा येथील सिंधी कॉलनीतील खासगी वाहनचालक राजा गोकुलदास पंजाबी (वय ३६) हा मुक्ताईनगरकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. महामार्गावरील पहलवान ढाब्याजवळ जबरदस्तीने वाहन थांबवून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून १२,५०० रुपये लुटण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संशयित आरोपी हितेश रमेश दामा (डोंबिवली, ता. कल्याण), संदीप रघुनाथ जाधव (उल्हासनगर, जि. ठाणे), किरण नारायण बडगुजर (बहादरपूर, ता. पारोळा) आणि समाधान सदा हटकर (पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, समाधान रघुनाथ पवार (पिंपळगाव हरेश्वर) आणि रवी पवार (जळगाव) हे दोघे फरार झाले आहेत.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १२,५०० रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले इनोव्हा वाहन जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अजय निकम, गोपीचंद सोनवणे, भूषण माळी, प्रवीण पाटील आणि प्रेमचंद सपकाळे करत आहेत.