एकाच रात्रीत तीन गावात घरफोडी; सहा लाखांचा ऐवज लंपास

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा, तळवेल, पिपंळगाव बु ॥  येथे एकाच दिवशी पाच घरात चोरीचा प्रयत्न तर सहा घरात अज्ञात चोरट्यानी चोरी करून सहा लाखाचा ऐवज चोरल्याची घटना मंगळवारच्या भल्या पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  तर घटनास्थळी श्वान पथक, गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी  बारकाईने पाहणी करून तपास कामी तीन पथके रवाना केले.

याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ओझरखेडा येथील रहिवाशी नाशिकेत चावदास नेमाडे यांच्या घरात चोरट्यानी प्रवेश करत  लोखंडी अलमारीतील अकरा तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपयाची रोकड लांबविली.  त्यांच्या भावाने त्यांना मोबाईल द्वारा यांची माहीती दिली होती.  कारण ते बाहेर गावी गेले होते.

तर पिंपळगाव बु ॥ येथील अशोक मधुकर सरोदे यांच्या घरातील दहा हजार रुपये, किसन शेनफडू बेंडाळे यांचे वीस हजार रुपये, अनंता सिताराम सरोदे यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांसह पंचवीस हजाराची रोकड लांबविली.  तर राहुल आत्माराम पाटील व निर्मालाबाई लक्ष्मण पाटील यांच्या घरातील रोख रक्कमसह पासष्ट हजार रुपयावर चोरट्यानी डल्ला मारला.

तळवेल येथेही पाच घराचे कडी कोडी, कुलूप तोडून रोकड व सोन्याचे दागिने लंपास केल्याची चर्चा असुन याबाबत मात्र पोलीसात कोणत्याही प्रकाराची तक्रार करण्यास कोणीही पुढे आले नाही.

या घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ, उप सह निरिक्षक परशुराम दळवी, पो हे कॉ प्रंशात ठाकुर, यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी तत्काळ दाखल होत पाहणी केली.   ठस्से तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्वान हॉपी याने घटना स्थळापासुन थोड्या अंतरावर चोरट्याचा मग दाखवत घुटमळले तर ठस्से तज्ञानी घटनास्थळी बारकाईने निरिक्षण करीत त्या ठिकाणचे ठस्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविले.

घटनेची माहीती मिळताच उप विभागीय पोलीस अधिक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पाहणी करून तपास कामी महत्वाच्या सुचना दिल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक  व वरणगाव पोलीसाचे तीन पथक वेगवेगळ्या दिशेने  चोरट्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे.

या घटनेमुळे खेडे परिसरात  भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.