लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय गीत वंदे मातरम्चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा) विधेयक 2026 ला मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरम्ला राष्ट्रगीत जन-गण-मनप्रमाणेच समान कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. संसदेने गेल्या महिन्यात राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण कायदा, 1971 मध्ये सुधारणा करणारे हे महत्त्वपूर्ण विधेयक बहुमताने मंजूर केले होते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले असून संपूर्ण देशात हा नियम लागू झाला आहे.
कायद्यानुसार, वंदे मातरम्चे गायन रोखणे किंवा गायन चालू असताना त्यात अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल. असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंतचा कारावास, दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीने हा गुन्हा पुन्हा केला, तर त्याला किमान 1 वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. याआधी 1971 च्या मूळ कायद्यात केवळ राष्ट्रगीत जन-गण-मनच्या अवमानाबाबतच शिक्षेची तरतूद होती. वंदे मातरम्ला राष्ट्रीय गीताचा दर्जा असूनही असा कोणताही थेट कायदेशीर आधार उपलब्ध नव्हता. हीच त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कलम 3 मध्ये सुधारणा करून वंदे मातरम्चा यामध्ये समावेश केला आहे.
विधेयकात 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बंकीमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम् या गीताने अतुलनीय योगदान दिले होते. म्हणूनच, वंदे मातरम्ला राष्ट्रगीत जन-गण-मनसारखाच दर्जा आणि सन्मान दिला गेला पाहिजे, अशी भूमिका घटना समितीने मांडली होती. कायद्यातील या सुधारणेमुळे घटना समितीच्या भूमिकेला आज कायदेशीर बळ मिळाले आहे. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून वंदे मातरम्चे गायन केले जाणार आहे.
अधिकृत कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम्ची सर्व 6 कडवी गायली जातील. यासाठी 3 मिनिटे 10 सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीत (जन-गण-मन) आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवले किंवा गायले जाणार असल्यास, वंदे मातरम् प्रथम गायले जाईल. राष्ट्रीय गीत सुरू असताना उपस्थितांना सावध स्थितीत उभे राहणे बंधनकारक असेल. देशातील सर्व शाळांमध्ये दैनंदिन कामकाजाची सुरुवात वंदे मातरम्च्या समूहगायनाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


