सत्तेच्या सारिपाटावर वंचितचे फासे !

सरकार स्थापन करणाऱ्यांसोबत : प्रकाश आंबेडकरांची स्पष्ट भूमिका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी जर उद्या वंचित बहुजन आघाडीला संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करु शकणाऱ्या पक्ष किंवा युती-आघाडीच्या सोबत राहणे पसंत करणार आहोत, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे. ‘एक्स’ सोशल मीडियावरुन ट्विट करत आंबेडकरांनी आपले मत व्यक्त केले आहे.

उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहे. वंचित बहुजन आघाडी यावेळी अनेक ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात आहे, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेत जाण्याचे संकेत दिले आहेत. याआधी वंचितने भाजपवरही टीका केली होती, तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचितने महाविकास आघाडीत येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वाटाघाटी सफल न झाल्याने वंचित स्वबळावर लढली, परंतु त्यांना एकही जागा मिळवण्यात यश आले नव्हते.

 

भाजपवर सडकून टीका

याआधी, विरारमध्ये विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप झाल्यानंतर वंचितने भाजपवर टीका केली होती. विनोद तावडे विरारच्या एका हॉटेलमध्ये उघडपणे पैसेवाटप करत असल्याचे समोर आले आहे. पैशांची मोठी रक्कम त्यांच्याकडे आढळून आली आहे. भाजपचा चेहरा या निमित्ताने उघडा पडला आहे. पैशांच्या जिवावर निवडणुका जिंकता येतात, हे भाजपच्या वारंवार कृतीतून स्पष्ट होत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. लोकशाहीला मारक कृत्य भाजपकडून करण्यात येत आहेत अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

 

आठवलेंकडून वेलकम

‘वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर वंचितांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, हे चांगले आहे. मात्र, पक्षाला मान्यता मिळेल, इतकी मते त्यांना मिळत नाहीत. मागील तीन निवडणुकांत त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यांनी महायुतीसोबत यावे. याशिवाय, रिपब्लिकन ऐक्य होत असेल तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करायला तयार आहोत’, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.