पाचोरा

शहरातील भास्कर नगर येथील भरवस्तीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेंद्र जाधव (रा. गोराडखेडा, ता. पाचोरा) हे बजाज फायनान्स कंपनीत कलेक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या बहिणीचे पाचोरा शहरातील भास्कर नगर येथे घर असून, बहिणी मुंबई येथे वास्तव्यास असल्याने शुभम जाधव हे त्या घरात राहत आहेत. त्यांच्या ताब्यात १४ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत वसूल केलेली ९० हजार रुपयांची रोकड होती. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन व १६ ऑगस्ट रविवार असल्याने ही रक्कम सोमवारी बँकेत जमा करणार होते.
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शुभम जाधव यांनी घराला कुलूप लावून गोराडखेडा येथे प्रस्थान केले. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ते भास्कर नगर येथील घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील बजाज फायनान्स कंपनीची वसूल केलेली ९० हजार रुपयांची रोकड, ५० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १ हजार ५०० रुपये किमतीची ३ भाराची चांदीची पैंजण असा एकूण १ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच शुभम जाधव यांनी पाचोरा पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शुभम जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध पाचोरा पोलिस घेत आहेत. शहरातील विविध कॉलनी भागात बंद घरांना लक्ष्य करून घरफोडीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


