यावल : यावल तालुक्यातील कासवा शिव रस्त्याने एका बंद स्टोन क्रेशरजवळ अवैध वाळु वाहतूककरणारे एकाच क्रमांकाचे दोन डंपर महसूल आणि पोलिसांच्या पथकाला दिसल्याने पथकाने दोन्ही डंपर जप्त करीत कासव्यातील संशयिताविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
कासवा, ता.यावल येथील शिव रस्त्यावर गट क्रमांक 8 मध्ये बंद स्टोन क्रेशर आहे. या ठिकाणी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, मंडळाधिकारी बबीता चौधरी, तलाठी एस.व्ही.सुर्यवंशी यांच्या पथकाला अवैधरीत्या तापी नदीतून वाळू वाहतूक करण्याकरिता दोन डंपर दिसून आले. या दोन्ही डंपरचे क्रमांक (एम.एच. 19 सी.वाय. 4648) असल्याने दोन्ही वाहनावर एकच क्रमांक टाकून शासनाची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाल्याने दोन्ही डंपर जप्त करण्यात आले.
याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय सपकाळे (कासवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास साहायक फौजदार रशीद तडवी करीत आहे.
10 ब्रास वाळू साठा जप्त
कारवाईदरम्यान कासवे येथील नदीपात्राजवळ अंदाजे 10 ब्रास रेती साठा देखील महसूल पथकाला मिळून आल्याने हा साठा बेवारस म्हणून पंचनामा करून जप्त करण्यात आला.