लवकरच येतोय ‘व्हॅलेंटाईन वीक’; जाणून घ्या प्रत्येक दिवस कसा साजरा कराल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

संपूर्ण जगभरात फेब्रुवारी महिन्यातील 14 तारखेला प्रेमाचा दिवस म्हणून ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentines Day) साजरा करण्यात येतो. त्यामुळे खासकरून तरुणाई या दिवसाची आवर्जून वाट पाहत असतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमाचे प्रतिक म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने बरेचजण आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा देतात.

‘व्हॅलेंटाईन डे’ चा इतिहास

रोममध्ये तीसऱ्या शतकातील क्लॉडियस या क्रूर राजाने प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांवर अनेक बंधनं लादली, त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. क्लॉडियस राजाचं असं मत होतं की, अविवाहित पुरूष हे विवाहित पुरूषांच्या तुलनेत अधिक चांगले होऊ शकतात. त्यामुळे त्याने सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न न करण्याचा आदेश दिला होता. संत व्हॅलेंटाइन यांनी राजाच्या या आदेशाला कडाडून विरोध केला होता. त्यांनी अनेक सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची लग्न लावून दिली होती.संत व्हॅलेंटाइन हे धर्मगुरू होते. त्यांनी प्रेमाचा प्रसार आणि प्रचार केला. पण राजाच्या आदेशाला धुडकावल्यामुळे राजाने त्यांना १४ फेब्रुवारीच्याच दिवशी फाशीची शिक्षा दिली. तेव्हापासून आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीला व्हॅलेंटाइन म्हणण्यास सुरूवात झाली. संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या या संत व्हॅलेंटाइन यांच्या आठवणीत दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून साजरा केला जातो.

कोणता दिवस कसा साजरा कराल..

रोज डे (Rose Day) : 7 फेब्रुवारी

प्रेमाची अभिव्यक्ती गुलाबाशिवाय अपूर्ण आहे. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात गुलाबाच्या सुगंधाने आणि सौंदर्याने होते. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना लाल गुलाब देतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात. केवळ कपल्सनी युगुलांनीच रोज डे साजरा करावा असे नाही, या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना गुलाब देऊन खास अनुभव देऊ शकता. पिवळे किंवा पांढरे गुलाब देऊन तुम्ही तुमच्या मित्रांना सहज खुश करू शकता.

प्रपोज डे (Propose Day) : 8 फेब्रुवारी

व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस ‘प्रपोज डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला हटके प्रपोज करून स्पेशल फिलिंग देऊ शकता.

चॉकलेट डे (Chocolate Day) : 9 फेब्रुवारी

चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही? पण, मुलांपेक्षा मुलींना चॉकलेट जास्त आवडते. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन नात्यात गोडवा वाढवू शकता.

टेडी डे (Teddy Day) : 10 फेब्रुवारी

मुलींना टेडी बेअरचे भारी वेड असते. त्यामुळे टेडी डेच्या दिवशी तुमच्या मैत्रिणीला एक छान टेडी बेअर भेट देऊ शकता.

प्रॉमिस डे (Promise Day): 11 फेब्रुवारी

प्रत्येक नात्यात अनेक वचने असतात, काही पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात. या प्रॉमिस डे, तुम्ही तुमच्या जोडीदाराला छोटी-छोटी वचने देऊ शकता, पण वचने अशी असावीत की, ती तुम्ही पाळू शकता.

हग डे (Hug Day) : 12 फेब्रुवारी

प्रॉमिस डेनंतर, या प्रेमळ आठवड्यात ‘हग डे’ साजरा केला जातो. आपली प्रिय व्यक्ती असो वा खास मित्र-मैत्रीण जेव्हाही भेटतात तेव्हा ते प्रथम एकमेकांना मिठी मारतात. परंतु या दिवशीची मिठी मात्र खास असते. त्यात भावभावना असतात. काहीही न बोलता, काहीही न ऐकता, प्रिय व्यक्तीला मिठी मारून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

किस डे (Kiss Day) : 13 फेब्रुवारी

या नंतर येतो ‘किस डे’. या खास दिवशी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना आणखी उत्कटतेने सांगू शकता.

व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) : 14 फेब्रुवारी

संपूर्ण आठवडाभर विविध प्रकारे प्रेम व्यक्त केल्यानंतर, 14 फेब्रुवारी हा दिवस येतो, जेव्हा दोन खास व्यक्ती त्यांचा संपूर्ण दिवस एकमेकांसोबत साजरा करतात. त्यांच्या प्रेमाला आणखी बहर यावा, दिवस स्पेशल वाटावा म्हणून खास नियोजन करतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.