चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय समता परिषद, चंद्रपूरच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने कोरपना येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली संतोष कोटरंगे यांची कोरपना तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष जगदीश जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अनिता दत्तू बोढे यांच्या हस्ते वैशाली कोटरंगे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात अखिल भारतीय समता परिषदेच्या महासचिव सुशीला मत्ते तसेच भद्रावती तालुकाध्यक्ष संगीता टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वैशाली कोटरंगे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत, त्यांच्या नेतृत्वाखाली कोरपना तालुक्यात समता परिषदेचे संघटन अधिक सक्षम होईल आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. नियुक्तीनंतर वैशाली कोटरंगे यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन समता, सामाजिक न्याय आणि जनसेवेच्या कार्याला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.


