वडगावजवळ मोटरसायकल व कारची भीषण धडक; एकाचा मृत्यू, दोन गंभीर

0

वडगावजवळ मोटरसायकल व कारची भीषण धडक; एकाचा मृत्यू, दोन गंभीर

रावेर (प्रतिनिधी) : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील वडगावजवळील सुकी नदी पुलाजवळ मोटरसायकल आणि ब्रिझा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वडगाव येथील जावेद सत्तार तडवी (वय ३९) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे दोन मित्र वसीम करीम (वय ३०) आणि बबलू अशरफ (वय २७) हे गंभीर जखमी झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तिघेही सुझुकी मोटरसायकल (एमएच ४८ बीएक्स ७९२६) वरून सावदा येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून परतत असताना, रावेरहून सावदाकडे येणाऱ्या ब्रिझा कार (एमएच १९ सीवाय १००७) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातात जावेद तडवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांना गंभीर दुखापत झाली. जखमींना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव येथे हलविण्यात आले आहे. घटनेची नोंद सावदा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.