पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर आनंदही

0

कविता ठाकरे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास करण्यासाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. नितळ मन आणि दिलदार स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य होते. देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल, हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे.

डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आणि प्रेरणादायी आहे. डॉ. कलाम नेहमी म्हणत असत की, ‘एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते’. म्हणून प्रत्येकाने डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन शाळा आणि महाविद्यालये तसेच अनेक ठिकाणी देखील करण्यात येते.

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, हे प्रमुख उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास वाढविण्याबरोबरच तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे. शाळांमध्ये दर आठवड्यातील एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे, शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये वाचन कट्टा तयार करणे यासारखे उपक्रमही यानिमित्ताने हाती घेण्यात येणार आहेत.

या दिनाच्या निमित्ताने शाळांनी फंडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तके खरेदी करून वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी साहित्यिकांमार्फत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे. वाचन दिनाच्या निमित्ताने त्या दिवसातील एक तास वाचनासाठी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनच जणू या दिनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच वाचन दिन अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मिडीयाचा वापरही करण्यात यावा.

सध्या इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमुळे विद्यार्थी इंटरनेटच्या अति मोहात पडल्याने वाचन कमी होत चालले आहे. तरीसुद्धा काही अंशी आज ई-बुकचे वाचन मुले करतात असा दावा केला जातो. मात्र हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद निराळाच असतो. शालेय मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सातत्याने प्रयोग आणि प्रयत्नांची गरज आहे. डॉ. कलाम म्हणतात, ‘विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांमध्ये ही उच्च गुणांची गरज आहे. तो ज्ञानाने संपन्न असावा. विद्यार्थ्यांशी आपुलकी असावी. जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असावा. केवळ पुस्तकी ज्ञान, शिक्षण देणे एवढेच न करता मुलांची मने उच्च ध्येयाने प्रज्वलित केली पाहिजे’.

विद्यार्थ्यांना टी.व्ही., स्मार्ट फोन, कॉम्प्युटर यापासून दूर करून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे हाच प्रमुख उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहाने साजरा केला जातो. पण हा दिवस फक्त तेवढ्याच दिवसापुरता मर्यादित राहायला नको याचाही विचार व्हायला हवा. दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम नेहमीच म्हणत असत की, ‘पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर नेहमीच मला आनंदही मिळाला आहे. ग्रंथ ही माझी सर्वात मौल्यवान अशी ठेव आहे. युवक वाचतील तर देश वाचेल अशी त्यांची खात्री होती.’ ‘वाचाल तर वाचाल’ असं आपण नेहमीच म्हणतो, पण त्या बोलण्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.