जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जळगावसह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या खुन प्रकरणातील मुख्य आरोपीची औरंगाबाद हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सोनवणे याची औरंगाबाद हायकोर्टाने तब्बल १८ वर्षानंतर निर्दोष मुक्तता केली आहे.
२१ सप्टेंबर २००५ रोजी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील हे नूतन मराठा महाविद्यालयात जात असताना मानराज पार्कजवळ त्यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात पोलिसांनी २५ सप्टेंबर २००५ रोजी काँग्रेस कार्यकर्ता राजू माळी व त्याचा शालक राजू सोनवणे तर ६ नोव्हेंबर २००५ रोजी लिलाधर नारखेडे व दामू लोखंडे यांना अटक केली होती.
कोर्टाने ३ फेब्रुवारी २००६ रोजी नारखेडे व लोखंडे यांच्या एफआयआर रद्द केली होती. नंतर सुप्रीम कोर्टानेही हाच निकाल कायम ठेवला होता. तर दुसरीकडे डॉ. जी.एन. पाटील व डॉ.उल्हास पाटील यांना देखील या खटल्यात सहआरोपी करण्यात आले होते. परंतु नंतर जळगाव सेशन्स कोर्टाच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती.
माळी व सोनवणे यांच्या विरोधात जळगाव कोर्टात खटला चालू असतांना ६ एप्रिल २००७ रोजी राजू माळी मयत झाला होता. त्यानंतर सोनवणे विरोधात खटला चालू ठेवण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये राजू सोनवणे याला जळगाव कोर्टाने आरोपी राजू सोनवणे यास खून करणे व खुनाचा कट रचणे या आरोपांखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
आता या प्रकरणी औरंगाबाद हायकोर्टात अनेक वर्षापासून सुनावणी सुरु होती. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी कोर्टाने राजू चिंतामण सोनवणे (माळी) याची निर्दोष मुक्तता केली आहे.

