अर्थशास्त्र लेखमाला : भाग १९
विध्यार्थी मित्रानो, राष्ट्रीय उत्पन्न संकल्पने नंतर आपण उपयोगिता ही संकल्पना, उपयोगितेची वैशिष्ट्ये, उपयोगितेचे प्रकार – एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, उपयोगिता संकल्पना, एकूण आणि सीमांत उपयोगिता आणि त्याचे सविस्तर प्रकार पाहणार आहोत.
उपयोगिता संकल्पनेचा अर्थ
सामान्य भाषेत, उपयुक्ततेचा अर्थ एखाद्या वस्तूच्या वापरातून किंवा वापरातून मिळणाऱ्या फायद्यासाठी लागू केला जातो, परंतु अर्थशास्त्रात, या शब्दाचा अर्थ सामान्य अर्थापेक्षा थोडा वेगळा आणि व्यापक आहे. अर्थशास्त्रात, उपयुक्तता म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी एखाद्या वस्तूची क्षमता किंवा गुणवत्ता. उपयुक्तता फायदेशीर आणि हानिकारक देखील असू शकते.
अर्थशास्त्रात ‘उपयोगिता’ (Utility) ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. उपभोक्त्याला विशिष्ट वस्तूपासून विशिष्ट लाभ मिळत असतो म्हणून तो मागणी करीत असतो. वस्तूच्या उपभोगानंतर त्याला समाधान मिळत असते. म्हणजेच वस्तूच्या अंगी उपभोक्त्याची गरज भागविण्याची क्षमता असते, त्या क्षमतेला उपयोगिता म्हणतात.
उपभोक्त्याकडून वस्तूतील उपयोगितेचा वापर करुन गरज भागविल्या जाणाऱ्या क्रियेस ‘उपभोग’ (Consumption) असे म्हणतात. वस्तूतील उपयोगितेचा वापर करून जी व्यक्ती आपली गरज भागवित असते त्यास ‘उपभोक्ता’ (Consumer) असे म्हणतात.
उपयोगितेची व्याख्या
उपयोगितेचा अर्थ समजण्यासाठी आपण पुढील मार्शल यांच्या उपयोगितेच्या व्याख्येचे स्पष्टीकरण करू.
मार्शल :
“वस्तू किंवा सेवेत व्यक्तीची विशिष्ट गरज भागविण्याची जी शक्ती असते त्यास उपयोगिता असे म्हणतात.” व्याख्येवरुन आपणास वस्तूच्या अंगी गरज भागविण्याची जी क्षमता असते त्यास उपयोगिता म्हणतात, हे समजते. उदा. भाकरीमध्ये भूक भागविण्याची क्षमता आहे. पेनामध्ये लिखाणाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे. वस्तूचा वापर होत असताना त्या वस्तूतील उपयोगिता कमी कमी होत असते.
उपयोगितेची वैशिष्ट्ये
उपयोगितेची पुढील वैशिष्ट्ये आपणास उपयोगितेचे स्वरूप चांगल्या रितीने समजून घेण्यास उपयुक्त आहेत, उपयोगितेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.
व्यक्तिनिष्ठ संकल्पना :
‘उपयोगिता’ ही संकल्पना व्यक्तीनिष्ठ संकल्पना आहे. वस्तूसंबंधीची उपयोगिता मूलतः व्यक्तीच्या मनात असावी लागते. विशिष्ट वस्तूत एका व्यक्तीला उपयोगिता आहे असे वाटते. तर दुसऱ्या व्यक्तीला त्याच वस्तूत काहीच उपयोगिता नसते असे वाटते. व्यक्तीनुसार वस्तूची उपयोगिता वेगवेगळी असते. उदा, व्यसनी व्यक्तीला दारुमध्ये खूप उपयोगिता आहे असे वाटते. निर्व्यसनी व्यक्तीला दारुमध्ये काहीही उपयोगिता नसते असे वाटते.
मानसिक स्थितीवर अवलंबून
वस्तूतील उपयोगिता ही व्यक्तीच्या मनःस्थितीवर अवलंबून असते. उदा. तहान लागलेल्या व्यक्तीला पाण्यात खूप उपयोगिता आहे असे वाटते. तहान पूर्ण झाल्यानंतर पाण्यात उपयोगिता कमी आहे असे वाटते.
उपयोगिता उपयुक्ततेपासून वेगळी उपयोगिता आणि उपयुक्तता यामध्ये फरक आहे. एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यास किंवा हितास धोकादायक असली तरी त्या वस्तुमध्ये उपयोगिता असते. म्हणजेच त्यात उपयुक्तता नसते. उदा. व्यसनी व्यक्तीच्यादृष्टीने दारुमध्ये उपयोगिता असते. परंतु आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असते. याचाच अर्थ, उपयोगिता व्यक्तिसापेक्ष असते आणि उपयुक्तता व्यक्तिनिरपेक्ष असते.
व्यक्ति, काल आणि स्थळ सापेक्ष उपयोगिता
उपयोगिता ही व्यक्ती व्यक्तीनुसार बदलत असते. : उदा. काही व्यक्तींना चहामध्ये खूप उपयोगिता आहे असे वाटते. तर काही व्यक्तींना चहामध्ये काहीही उपयोगिता नाही, असे वाटते. तसेच काही व्यक्तींना जास्त चहा पिण्यात उपयोगिता वाटते. चहा सकाळी पिण्यात उपयोगिता वाटते तर त्याच व्यक्तीला दुपारी चहा पिण्यात उपयोगिता वाटत नाही. थंड प्रदेशात चहामध्ये उपयोगिता वाटते. तर त्याच व्यक्तीला उष्ण प्रदेशात चहामध्ये उपयोगिता वाटत नाही.
उपयोगितेत नैतिकतेला स्थान नाही
उपयोगितेचा नैतिक दृष्टिकोनातून विचार केला जात नाही. व्यक्तीची वस्तूच्या उपभोगातून गरज भागते की नाही एवढाच विचार उपयोगितेमध्ये केला जातो. उदा. दोन गिज्यामुळे एखाद्या व्यक्तीची गरज भागते परंतु दारू पिणे नैतिकदृष्ट्या इष्ट कि अनिष्ट याचा विचार केला जात नाही.
उपयोगिता समाधानापासून वेगळी असते. व्यक्तीने एखाद्या वस्तूचा उपभोग घेतला म्हणून त्या व्यक्तीस समाधान मिळेल असे नाही. वस्तूच्या उपभोगामध्ये प्रथम उपयोगिता येते आणि नंतर प्रत्यक्ष उपभोगानंतर समाधान येते. उपयोगिता म्हणजे अपेक्षित समाधान होय.
उपयोगिता घटत जाते एखाद्या वस्तूच्या नगाचा सातत्याने उपभोग घेत गेल्यास उपभोक्त्याला त्यापासून मिळणाऱ्या उपयोगितेत घट होत जाते. उदा. पहिल्या भाकरीपासून जेवढी उपयोगिता मिळते त्यापेक्षा कमी उपयोगिता दुसऱ्या भाकरीपासून मिळते.
क्रमश:

लेखिका : प्राध्यापिका (अर्थशास्त्र)
मेल. drritashetiya14@gmai.com