यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल नगरपालिकेच्या दि. १६ रोजी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत तब्बल २५ हजार रुपयांच्या एका खुर्चीच्या खरेदीचा मुद्दा चांगलाच गाजला. सभागृहातील फर्निचर खरेदीसंदर्भात नगरसेवक सागर चौधरी यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरत, “जनतेच्या कराच्या पैशांची अशी उधळपट्टी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला. लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत विकासकामे, नागरी सुविधा, आर्थिक मंजुरी आणि विविध प्रशासकीय विषयांसह एकूण १५० विषयांवर चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो २५ हजार रुपयांच्या एका खुर्चीच्या खरेदीचा.

नगरसेवक सागर चौधरी यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत, एवढ्या महागड्या खुर्चीची आवश्यकता काय होती? खरेदी प्रक्रिया कोणत्या निकषांवर करण्यात आली? बाजारभावाची पडताळणी झाली होती का? याबाबत प्रशासनाने स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, “शहरातील नागरिक मूलभूत सुविधांसाठी झगडत असताना नगरपालिकेत आलिशान खुर्च्यांवर हजारो रुपये खर्च करणे योग्य नाही. हा पैसा नागरिकांचा असून त्याचा प्रत्येक रुपया जबाबदारीने खर्च झाला पाहिजे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी आम्ही कदापि सहन करणार नाही.”
सभागृहात या मुद्द्यावर काही काळ जोरदार चर्चा झाली. अनेक सदस्यांनी सार्वजनिक निधीच्या खर्चात पारदर्शकता आणि काटेकोरपणा राखण्याची गरज व्यक्त केली. नगरपालिकेच्या प्रत्येक खरेदी प्रक्रियेत नियमांचे पालन होऊन खर्चाचा तपशील लोकांसमोर यावा, अशीही मागणी सदस्यांकडून करण्यात आली. विशेष म्हणजे, २५ हजार रुपयांच्या आलिशान खुर्चीच्या खरेदीचा निषेध नोंदवत नगरसेवक सागर चौधरी यांनी सभागृहात त्या खुर्चीवर बसण्यास नकार देत स्वतंत्र साध्या खुर्चीवर आपले आसन ग्रहण केले. त्यांच्या या भूमिकेची सभागृहात विशेष चर्चा रंगली असून, जनतेच्या पैशांच्या काटेकोर वापराबाबत त्यांनी दिलेला संदेश उपस्थित सदस्य आणि नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला.
दरम्यान, सभेत शहरातील विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, विविध विभागांचे प्रस्ताव तसेच प्रशासकीय बाबींशी संबंधित १५० विषयांना मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांनी सभेचे कामकाज सुरळीत पार पाडत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेतले. मात्र विकास विषयांपेक्षा २५ हजार रुपयांच्या एका खुर्चीचा मुद्दाच संपूर्ण सभेचा केंद्रबिंदू ठरला. या खरेदीबाबत आता प्रशासन कोणता खुलासा करते आणि पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे यावलकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.


