लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल, २ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होती. उमेदवारी अर्जांच्या छाननीत एकूण ४०२ उमेदवारी अर्जांपैकी ३०९ अर्ज वैध ठरले आणि ९३ अर्ज बाद झाले. बाद झालेल्या उमेदवारांना तीन दिवसांच्या आत नाशिक विभागीय निबंधकांकडे अपील दाखल करता येते. दरम्यान, पाचोरा सोसायटी मतदारसंघातून आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोर पाटील यांचा अर्ज काल बाद झाला. त्यानंतर त्यांच्या बाद झालेल्या अर्जावर युक्तिवाद करण्यात आला. तो युक्तिवाद एकदम सकारात्मकरीत्या झाला, असे खुद्द उमेदवार सुमित पाटील यांचे म्हणणे आहे. तरीसुद्धा माझा अर्ज बाद झाला. याला कारणीभूत कोणत्यातरी राजकीय शक्तीचा दबाव आहे. कोणती अदृश्य शक्ती आहे, याची मला माहिती नाही. मित्रपक्ष हेच राजकीय शत्रू बनले आहेत, असा आरोपही सुमित पाटील यांनी केला आहे. आज सकाळी नऊ वाजेपासून मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आलो आहे; पण तेथे कार्यालयाला कुलूप लागले आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने खुलासा करण्यात आला की, काल, २ नोव्हेंबर रोजी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण कामकाज आटोपून निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची यादी बोर्डावर लिहून आम्ही गेलो. त्यावेळी रात्र उशिराची झाली होती; परंतु आम्ही अर्जांची यादी बोर्डावर लावलेली होती. त्यामुळे आमच्याकडून कुठलेही काम चुकलेले नाही. अर्ज बाद झालेले उमेदवार काहीही आरोप करतात, ते आम्हाला मान्य नाही. एकंदरीत, पाचोरा मतदारसंघातून सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाल्यामुळे त्यांचा थयथयाट सुरू आहे. आता आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, अशी धमकीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. अर्ज बाद प्रकरण आता हायकोर्टात जाणार आहे. हायकोर्टात त्याला दाद मागण्यात येणार आहे, असे सुमित पाटील यांनी सांगितले. या मतदारसंघात सलग दहा वर्षे आमदार किशोर पाटील हे संचालक राहिल्यामुळे बँकेच्या नवीन कायद्यानुसार त्यांना संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी घेऊन उभे राहता येत नाही. म्हणून त्यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी अर्ज भरला होता. पाचोरा या मतदारसंघात सुमित पाटील यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सतीश शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने ते आपोआपच संचालक पदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येणार असल्याचे कळते. एकंदरीत, सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे त्यांनी जोरदार हंगामा केला. त्यांचे म्हणणे हेच आहे की, कुणाच्या दबावामुळे माझा अर्ज बाद झाला, हेच मला बघायचे आहे. तसाच प्रकार जामनेर तालुक्यात झाला आहे. जामनेर सोसायटी मतदारसंघात नांद्रा येथील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता; परंतु काहीतरी क्युरी काढून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. कारण सोसायटी मतदारसंघात जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे देखील निवडणूक लढवीत आहेत; पण त्यांनी रीतसर निवडणुकीला सामोरे जायला हवे होते. मात्र, त्यांनी तसे न करता त्यांचा अर्ज बाद ठरवला, असा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दिलीप खोडपे यांनी उघडपणे केला आहे. अशा प्रकारे उमेदवारी अर्ज बाद करण्याची किमया केली जात आहे, असे आरोप होत आहेत. परंतु त्यांना तीन दिवसांच्या आत नाशिक विभागीय उपनिबंधक यांच्याकडे अपील करता येते. तशी त्यांनी अपील करावी आणि आपले नशीब आजमावावे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे वर्चस्व चांगलेच दिसून येत आहे. त्यामुळे महायुती म्हणून भाजप आणि शिवसेना यांच्यात जागांवरून वाद निर्माण होत आहेत. शिवसेनेला जास्त जागा मिळाव्यात, अशी मागणी होत आहे; परंतु भाजपला ते मान्य नाही. म्हणून भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीबरोबर भाजपची युती झालेली आहे. शिवसेनेतर्फे दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे संचालक मंडळात शिवसेनेचे वाढते वर्चस्व दिसून येत आहे. म्हणून तिढा निर्माण झाला आहे. तो तिढा कसा सुटेल, हे पाहावे लागेल. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र प्रताप पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही जागांवर ते निवडून येण्याची दाट शक्यता आहे. एकूण २१ जागांच्या संचालक मंडळात सर्वाधिक संचालक त्यांचे असतील. त्यांचा बँकेच्या चेअरमनपदावर दावा राहील. या निवडणुकीत माजी मंत्री, अमळनेरचे अनिल भाईदास पाटील आणि बँकेचे चेअरमन संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज सलग दहा वर्षे संचालक असल्याने नवीन कायद्यानुसार बाद झाले आहेत. हा नियम त्यांना माहीत असताना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा, हे अजबच म्हटले पाहिजे. कुठली तरी क्युरी निघेल आणि आपले उमेदवारी अर्ज वैध ठरतील, असे त्यांना वाटले होते की काय? एकूण नऊ उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती आल्या आहेत. त्यात तीन धरणगाव तालुक्यातून, तर चार मुक्ताईनगर तालुक्यातून हरकती होत्या. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबतीतही हरकत घेण्यात आली होती. त्या कुठल्यातरी बँकेच्या साक्षीदार आहेत, अशी त्यांच्या अर्जाबाबत हरकत होती; पण त्यांनी ना-हरकत प्रमाणपत्र दाखल केल्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि रोहिणी खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. कारण दहा वर्षे सलग संचालकपदी राहिल्यामुळे नवीन नियमानुसार त्यांना संचालक म्हणून राहता येत नाही. त्यामुळे त्यांनी अर्जच भरला नाही. एकनाथराव खडसे यांच्या जागी त्यांचे स्वीय सहाय्यक कोलते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे. आता ३०९ वैध उमेदवारी अर्जांपैकी किती जण १७ नोव्हेंबरपर्यंत माघार घेतात, यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

