चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील उंटावद या गावात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या संदर्भातील ठराव करून गावात कायमस्वरूपी दारूबंदीची अंमलबजावणी करावी. म्हणुन यावल पोलीस ठाण्यात नागरिकांनी निवेदन दिले आहे व गावात दारू विक्री करणाऱ्या चार लोकांची नावे देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उंटावद ता. यावल या गावात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामसभा होती. या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी सर्वानुमते दारूबंदीसाठी आग्रह धरला, सरपंच छोटू भिल, उपसरपंच भावना पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथे दारूबंदीचा ठराव करण्यात आला. दरम्यान ठराव केल्यानंतर ग्रामस्थांनी तेथूनच यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे यांच्याकडे गावात दारूबंदीचा ठराव करण्यात आला. गावात दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
गावात दारू बंदीच्या अंमलबजावणी करीता पोलिसांनी देखील दारू विक्रेत्यांवर अंकुश ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गावात जे चार लोकं दारू विक्रीचा व्यवसाय करतात त्यांची नावे नागरिकांनी दिली आहे. तेव्हा सदर निवेदन देते प्रसंगी मोठ्या संख्येत महिला व पुरूष ग्रामस्थांची उपस्थिती होती.