जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान!

0

 

लोकशाही संपादकीय लेख 

सप्टेंबर महिन्याच्या मध्यानंतर अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक वाहून जमीन देखील खरडून गेली. घरात पाणी शिरले. घरातील सर्व किडूक मिडूक पाण्यात वाहून गेले. शेतकऱ्यांची जनावरे देखील पाण्यात वाहून गेली. काही जनावरांचा मृत्यू देखील झाला. अनेक कुटुंबांना पाण्यापासून वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले देखील, मात्र सर्व काही वाहून गेल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला आहे. 70 टक्के शेतकरी हताश झाला आहे. त्यांचा संसार उघडावर पडलेला असून अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वत्र चर्चा सुरू झाली. शासनाने या शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले. हे पॅकेज तोकडे आहे. प्रती हेक्टर 50 हजार रुपये आर्थिक मदत सरसकट मिळावी, मृत पावलेल्या जनावरांना योग्य किंमत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी वेगळी मोठी रक्कम मिळावी, अशी शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षातर्फे हल्लाबोल करून मागणी सुरू आहे. तो मदतीचा वाद सुरू असताना, दिवाळीनंतर गेले दोन-तीन दिवस अवकाळी पावसाने पुन्हा जळगाव जिल्ह्याला झोडपले.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अमळनेर आणि भुसावळ तालुक्यांत अवकाळी पावसाने कहर केला. शेतात काढून ठेवलेले कसेबसे थोडेसे वाचवलेले सोयाबीन तेही अवकाळी पावसामुळे फस्त झाले. मक्याचे थोडे बहुत राहिलेल्या पिकाच्या कणसाला कोंब फुटले. शेतातील उभ्या कापसाची बोंडे भिजून गेली. पाचोरा तालुक्यात रब्बीचा हंगाम पेरणीसाठी जमिनीच्या मशागतीला ब्रेक लागला. म्हणजे आधीच उघड्यावर पडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील थोडे बहुत पिकाचे देखील तीन तेरा झाले. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सणात शेतकरी दुःख सागरात बुडाल्याने त्यांनी काळी दिवाळी साजरी केली. आता काळ्या दिवाळीनंतर अवकाळी पावसाने झोडपल्याने पुन्हा एकदा शेतकरी प्रचंड हतबल झाला आहे. आधीच मरणासन्न झालेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करून शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईत घालत आहेत. शेतकरी आधीच कोसळला आहे. यंदा कधी नव्हे तितक्या आसमानी संकटात शेतकऱ्यांना हताश व्हावे लागले आहे. आगामी रब्बीच्या हंगामाला अवकाळीमुळे शेत जमिन उपयोगी येणार नाही. त्यामुळे भविष्यात काय होईल या चिंतेत शेतकरी आहे…

जळगाव जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटात होरपळत असताना महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा निघत आहे. परंतु आमचे संवेदनशील राजकारणी विशेषतः महाराष्ट्राचे सत्ताधारी राजकारणी आक्रोश मोर्चेकर्‍यांची टिंगल टवाळकी करण्यात मग्न आहेत. विधानसभेत सत्ता हातून गेली म्हणून विरोधकांना आता शेतकऱ्यांचा कळवळा आल्याची जहरी टीका सत्ताधारी करीत आहे. त्यात अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे सभा घेऊन आक्रोश मोर्चा काढणाऱ्या माजी आमदार बच्चू कडून यांच्यावर प्रखर टीका करीत आहेत. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांविषयी सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा ते आपले वैयक्तिक राजकारण करून स्वतःचा कंड शमवीत आहेत. महायुतीमध्ये विशेषता भाजपमध्ये अशा प्रकारच्या राजकारण्यांना अशी टीका करण्याची मुभा दिली असल्याने राणा दांपत्य तसेच मंत्री राणे अशा प्रकारची जहरी वक्तव्य करण्यासाठी सोडलेली आहेत.

शेतकरी हवालदील झाला असताना त्यांना पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी जे विरोधक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोर्चे काढत आहेत, त्यांच्यावर टीका करून त्यांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात या एका हिडीस प्रकाराची घुसखोरी झाली आहे, हे दुर्दैव होय. आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जे हातचे पीक होते ते हिरावून घेतले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे करून त्यांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी राजकारण करत आहेत का? किंवा विरोधक राजकारण करत आहेत, म्हणून सत्ताधारी ओरडत आहेत? या प्रश्नाचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. तथापि ते उत्तर मिळव न मिळो, पण अवकाळी ने भरडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून त्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. ती मदत अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देऊन माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे दाखवून देणे आवश्यक आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.