नवी दिल्ली । देशात कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील लॉकडाउन ३० जून पर्यंत वाढवण्यात आले आहे. लॉकडाऊन 5.0 साठी सरकारकडून आता शिथिलता आणण्यात येत आहे. यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सुचनादेखील जारी केल्या आहेत. हे लॉकडाउन तीन टप्प्यात विभागलं गेलं आहे आणि त्याला अनलॉक -1 (Unlock-1) असं नाव देण्यात आलं आहे. त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने सरकारने कंटेनमेंट झोन वगळता सूट दिली आहे. तसेच राज्यांना लॉकडाउन संदर्भातील नियम ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. पाहुयात कोणत्या गोष्टी सुरु होणार आहेत आणि कश्या टप्प्याने त्या सुरु होणार आहेत . त्यामुळे जाणून घेऊयात याबद्दल…
पहिल्या टप्प्यात काय उघडणार
– आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
– हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
– शॉपिंग मॉल उघडणार.
दुसऱ्या टप्प्यात काय उघडणार
– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील. पालकांसह सर्व संबंधितांचे याबद्दल मत जाणून घेण्यात येईल. जुलै महिन्यात या संदर्भात निर्णय होईल.
तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार
सर्व परिस्थितीचे आकलन करुन, व्यवस्थित आढावा घेऊन रेल्वे, हवाई प्रवास कधी सुरु करायचा त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
– सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
– क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.