
लोकशाही न्यूज नेटवर्क
दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाने नायगाव–किनगाव मार्गावर रात्री सुमारे 10 वाजता सापळा रचून कारवाई केली. या वेळी संशयित महिंद्रा पिकअप (क्रमांक एमएच 04 ईएल 7658) वाहनाची तपासणी करण्यात आली असता, प्लास्टिक क्रेटच्या खाली लपवून ठेवलेले विनापरवाना सागवान लाकूड आढळून आले.
तपासणीत एकूण 8 नग सागवान चौपाट (सुमारे 0.177 घनमीटर) जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत 3,939 रुपये आहे. संबंधित वाहनाची किंमत सुमारे 5,25,000 रुपये असून, एकूण 5,28,939 रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे.
कारवाईदरम्यान वाहन चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. वन विभागाने वाहनासह जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन शासकीय काष्ठ आगार, यावल येथे जमा केला आहे. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) यावल यांनी प्रथम अहवाल क्रमांक 06/2026, दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी नोंदविला असून, भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 41(2)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक सौरिष सहाय (यावल वन विभाग, जळगाव) आणि सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी (यावल पश्चिम/संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन), वनपरिमंडळ अधिकारी विपुल पाटील (वाघझिरा), संजय इंडे (हरीपुरा) यांच्यासह वनरक्षक हनुमंत सोनवणे, चेतन शेलार, अक्षय रोकडे, इंदल चव्हाण, मोहन कच्छवाह, आनंद तेली, सरला भोंगरे आणि सीमा भालेराव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. वन विभागाकडून फरार चालकाचा शोध सुरू असून, अशा बेकायदेशीर लाकूड वाहतुकीविरुद्ध पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

