आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सवात सहभागींसाठी विद्यापीठाचे प्रशिक्षण शिबीर…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

महाराष्ट्र राज्यपाल कार्यालयातून नियोजित कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा उत्सव असलेला    आंतरविद्यापीठीय इंद्रधनुष्य युवा महोत्सव २०२२ हा राहुरी, अ.नगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ याठिकाणी दि.४ नोव्हेंबर २०२२ पासून ०९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या मध्ये महाराष्ट्रातील कृषी, अकृषी, आयोग्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि मुक्त विद्यापीठ मिळून २२ विद्यापीठांचा सहभाग असणार आहे.

आपल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून या आंतरविद्यापीठीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवामध्ये कलाकार विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या मध्ये संगीत कलाप्रकारातील शास्त्रीय गायन, शास्त्रीय वाद्य, सुगम गायन, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य समूह गायन, लोक संगीत वाद्यवृंद अशा ६ कलाप्रकारात, नृत्य कला प्रकारातील लोक नृत्य, शास्त्रीय नृत्य दोन, तसेच साहित्य कलाप्रकारातील प्रश्न मंजुषा, वक्तृत्व, वाद विवाद तीन, आणि ललित कला प्रकारातील चित्रकला, कोलाज, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंग्य चित्रे, रांगोळी, स्थळ छायाचित्रण आणि जोडणी या आठ कला प्रकारात एकूण ३१ विद्यार्थी ७ साथीदार आणि २ संघ व्यवस्थापक असा ४० जणांचा सहभाग असणार आहे.

हे सर्व विद्यार्थी युवारंग आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवातील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी आहेत. यामध्ये सर्वाधिक २४ विद्याथी हे मूळजी जेठा महाविद्यालयातून निवडण्यात आले असून, तीन विद्यार्थी प्रताप कॉलेज अमळनेर, २  विद्यार्थी क.ब.चौ.उमवि च्या सामाजिक शास्त्र प्रशाळेतून, १ विद्यार्थी किसान कॉलेज पारोळा येथून आणि १ विद्यार्थी आय.एम.आर.कॉलेज जळगाव येथील आहे. या सर्वांचे तज्ञ प्रशिक्षकांकडून योग्य प्रशिक्षण मिळण्यासाठी आणि इंद्रधनुष्य युवा महोत्सवादरम्यानच्या विविध सूचना देण्यासाठी दि. १ आणि २ नोव्हे. रोजी विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थी भवन, क.ब.चौ.उमवि याठिकाणी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये साहित्य प्रकारासाठी  कवी लेखक डॉ.आशुतोष पाटील, प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर, नृत्य दिग्दर्शिका अपर्णा भट, लोक नृत्य प्रशिक्षक नाना सोनावणे, तबला वादक तेजस मराठे, प्रसिद्ध चित्रकार प्रा.पियुष बडगुजर, नृत्य दिगदर्शक प्रा.अजय शिंदे, गायक प्रा.कपिल शिंगाणे, ताल वाद्य प्रशिक्षक प्रा.देवेंद्र गुरव यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रो.अनिल डोंगरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. समारोप प्र-कुलगुरु प्रो.डॉ. एस.टी. इंगळे यांच्या उपस्थितीत झाला. या शिबिराचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी केले.

या इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२२ च्या क.ब.चौ.उमवि टीमचे समन्वय, निवड आणि संघ व्यवस्थापन करण्यासाठी मू.जे.महाविद्यालयाचे प्रा.विजय लोहार यांची नियुक्ती विद्यापीठाच्या वतीने करण्यात आली आहे. सोबत महिला संघ व्यवस्थापक म्हणून अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातील डॉ.रुपाली चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.