जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात देशभरात विकासाची गुढी उभारली गेली असून सर्वच क्षेत्रात विकास कामांना चालना देण्यात आली आहे. बेरोजगारीचे उच्चाटक करुन नव्या प्रकल्पांना गती देण्यात आल्याने देश प्रगतीच्या मार्गावर असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महापौर दिपमाला काळे, विजय नारखेडे उपस्थित होते.
श्रीमती रक्षा खडसे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या 12 वर्षांच्या प्रवासावर चर्चा करत आहोत, ज्याने केवळ देशाचा चेहरामोहराच नव्हे तर त्याचे भवितव्यही बदलले आहे. या 12 वर्षांची सर्वात मोठी ताकद म्हणजे लोकांचा अढळ विश्वास आणि सरकारची सेवाभावी वृत्ती होय. 2014 मध्ये देशाने मोदींवर विश्वास ठेवला, 2019 मध्ये त्याहूनही मोठ्या बहुमताने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून देऊन जनतेने हे स्पष्ट केले आहे की, देश केवळ आश्वासनांना नव्हे, तर कामगिरीला महत्त्व देतो. याच जनतेच्या विश्वासामुळे एनडीए 22 राज्यांमध्ये जनतेची सेवा करत आहे. सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वात आधी पीएम किसान सन्मान निधी फाईलवर स्वाक्षरी केली. यावरून हे स्पष्ट होते की, या सरकारसाठी गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला यांना सर्वोच्च प्राधान्य आहे.
मोदी सरकारने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा मंत्र केवळ एक घोषणा न ठेवता, त्याचे एका जनआंदोलनात रूपांतर केले आहे. प्रत्येक योजनेचा 100 टक्के लाभ रांगेतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा, हे सुनिश्चित करणे हे सरकारचे एकमेव ध्येय राहिले आहे. परिणामी, गेल्या काही वर्षांत जवळपास 25 कोटी लोक दारिद्य्ररेषेच्यावर आले आहेत. तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रशासनाच्या मदतीने, थेट बँक खात्यात पैसे पाठवून लाखो बनावट लाभार्थ्यांना हटवण्यात आले. यामुळे केवळ सर्वसामान्यांचे जीवन सुकर झाले नाही, तर देशाच्या तिजोरीची 4.31 लाख कोटींची बचत झाली.
आज देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा अत्यंत मजबूत आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांसारख्या कारवायांनी हे स्पष्ट केले आहे की हा एक नवा भारत आहे, जो स्वस्थ बसून राहत नाही तर प्रत्युत्तर देतो. सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे देश आज नक्षलवादापासून मुक्त झाला आणि आपला रेड कॉरिडॉर आता ग्रीन ग्रोथ झोनमध्ये रूपांतरित झाला आहे. पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्येही कटमनी आणि भ्रष्टाचाराचे राजकारण संपुष्टात येत आहे आणि लोकांना त्यांचे हक्क मिळत आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, मोदी सरकारची गेल्या 12 वर्षांची कारकीर्द हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने केलेला एक उल्लेखनीय प्रवास आहे.
गरिबांच्या कल्याणाबद्दल बोलायचे झाल्यास, सरकारने जन धन योजने अंतर्गत 58 कोटींहून अधिक बँक खाती उघडली, ज्यापैकी 32 कोटींहून अधिक महिला आहेत. कोविड-19 महामारीच्या कठीण काळापासून 81 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन पुरवण्यात आले आहे. गरिबांना वैद्यकीय खर्चापासून वाचवण्यासाठी, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक आरोग्य कार्ड जारी करण्यात आले आहेत, ज्यामुळे मोफत उपचारांची हमी मिळते. याशिवाय, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेने 58 कोटींहून अधिक लोकांना भक्कम सुरक्षा कवच प्रदान केले आहे. गरिबांचे जीवन सुकर करण्यासाठी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 4 कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 11 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन त्यांना धुरापासून मुक्त करण्यात आले आहे असे त्यांनी नमूद केले.
कृषी क्षेत्रात मोठा बदल
कृषी क्षेत्रातील सर्वात मोठा बदल सिंचनाच्या क्षेत्रात झाला आहे. आमच्या सरकारचा विश्वास आहे की शेतजमिनीसाठी पाण्याची उपलब्धता ही शेतकऱ्याची सर्वात महत्त्वाची गरज आहे. 2014 पूर्वी, देशातील सिंचनाची व्याप्ती मर्यादित होती आणि पाण्याच्या वापराची कार्यक्षमता अत्यंत कमी होती. मात्र, मोदी सरकारच्या दूरदर्शी धोरणांनी एक ऐतिहासिक बदल घडवून आणला आहे.


