वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

लहान भावाच्या मुलीचे लग्न असल्याने अनेक दिवसांपासून त्याची तयारी सुरू होती. घरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आणि पाहुण्यांची लगबग होती. त्यातच पुतणीचे लग्न लावून देण्यासाठी मोठे बाबा स्वतः सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होते. या आनंदाच्या क्षणी अचानक काळाने घाला घातला आणि काकांना मृत्यूच्या दाढेत ओढल्याने लग्नघरच्या मंगलकार्यांत शोककळा पसरल्याची घटना शहरात दि. १ मे रोजी घडली.
या बाबत असे की, शहरातील काळबांडे वाड्यातील रहिवासी ज्ञानेश्वर प्रभाकर गव्हाणकर यांच्या ज्येष्ठ सुकन्येचे लग्न दि. १ मे रोजी शहरातीलच सुनील सुकदेव माळी यांच्या मुलासोबत निश्चित झाले होते. त्यामुळे दोन्ही घरांत आनंदमय, लगीनघाईचे वातावरण होते. या मंगलकार्यासाठी अनेक दिवसांपासून लग्नाची तयारी सुरू होती. आपल्या लाडक्या पुतणीचे लग्न लावून देण्यासाठी मोठे बाबा सदाशिव प्रभाकर गव्हाणकर (माळी) (५२) स्वतः सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होते.
लग्नाच्या आदल्या दिवशी, दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास नवरी मुलीला हळद लावल्यानंतर लग्नासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर रात्री डीजेच्या वाजतगाजत नाचगाणी झाली. दिवसभर धावपळ करून दमलेले सदाशिव गव्हाणकर हे सकाळी लवकर उठण्याच्या उद्देशाने, लग्नाचा मुहूर्त असल्याने, लवकरच झोपले होते.
सकाळी घरातील सर्वजण उठून तयारीला लागले, मात्र घरातील कर्ते व्यक्ती अजून झोपेतून उठले नव्हते. त्यांना उठविण्यासाठी घरातील मंडळींनी हाक मारली, पण खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या जवळ जाऊन उठविण्याचा प्रयत्न केला असता ते उठलेच नाहीत.
लग्नघरातील कर्ते सदाशिव (बापू) यांच्या निधनाची वार्ता कळताच लग्नमंडपातील आनंदाचे वातावरण पूर्णपणे विरून गेले. पुतणीचे कन्यादान करून तिला सुखाचा संसार पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मोठ्या बाबांनी लग्नाच्या दिवशीच या जगाचा निरोप घेतल्याने नियतीच्या या खेळाने समाजमन सुन्न झाले आहे.
लग्नाचा मुहूर्त ठरलेला असल्याने आणि सर्व तयारी पूर्ण झालेली असल्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने, मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीने, शोकमय वातावरणात विवाह संपन्न झाला. त्यानंतर संध्याकाळी सुमारे सात वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


