मासिकपाळी वरून बहिणीवर संशय; भावाने केलं हे कृत्य…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

देशात अजूनही महिलांच्या मासिक पाळी विषयी कमालीचे अज्ञान दिसून येते. आणि पुरुषांना त्या बाबतीत खूप कमी माहिती असल्याचे वारंवार दिसून येत. अशाच अज्ञानातून एका सक्ख्या भावाने आपल्या बहिणीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर येथे घडली आहे. बहिणीला पहिल्यांदाच आलेल्या मासिक पाळीवरून आपल्याच बहिणीच्या चारित्र्यावर त्याने संशय घेतला. आणि त्यामुळे सलग काही दिवस त्याने तिला मारहाण केली. यामुळे १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यवर्ती रुग्णालयात रविवारी दुपारच्या सुमारास एका १२ वर्षीय मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्याच कुटुंबीयांनी या मुलीला रुग्णालयात आणले होते. त्यावेळी तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मुलीला तपासून मृत घोषित केले. मात्र मुलीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्याने डॉक्टरांनी तत्काळ मध्यवर्ती पोलिसांना याबाबत कळवले. याप्रकरणी वेळ न दवडता पोलिसांनी चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान आपणच बहिणीला मारहाण केल्याचे या भावाने कबूल केले. याबाबत त्याला कारण विचारले असता बहिणीला अचानक झालेल्या रक्तस्त्रावावरून संशय आल्याने आपण बहिणीला मारहाण केली असल्याचे भावाने सांगितले. हा नराधम बहिणीला अनैतिक संबंधाबाबत सातत्याने विचारत मारहाण करत होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र त्या मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी सुरू झाली होती. मात्र तरीही सलग चार दिवस या नराधम भावाने त्याच्या अल्पवयीन बहिणीला लोखंडी सळई आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात आधीच आलेला अशक्तपणा आणि उपाशी असल्याने मुलीची तब्येत खालावली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. म्हणून या भावाने तिला रुग्णालयात उपचारासठी आणले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. मात्र तोपर्यंत या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. भावाच्या या क्रूर कृत्यामुळे त्याच्याविरुद्ध संताप व्यक्त केला जातो आहे. तर मुलीच्या या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुळची उत्तर प्रदेशातील असलेली ही मुलगी कॅम्प तीन भागात आपल्या भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.