लोकशाही संपादकीय लेख
मुंबईच्या शिवाजी पार्कवर परंपरेप्रमाणे यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा झाला. मुंबईत दसऱ्याच्या दिवशी यंदा पाऊस असल्याने उद्धव ठाकरेंचा मेळावा होणार की नाही? किंवा पावसाचे मेळाव्यावर विघ्न येईल का? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु भर पावसातही शिवाजी पार्कवर चिखल झाला असताना त्या चिखलात बसून शिवसैनिकांनी भाषण ऐकण्यासाठी तुफान गर्दी केली होती, हे विशेष होय. 40 मिनिटाचे उद्धव ठाकरेंचे भाषण झाले. तेव्हा भाषणात शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी भाषण आवरते घेऊ का? असा प्रश्न विचारला. तेव्हा शिवसैनिकांनी “भाषण चालू ठेवा.. थांबवू नका..” असे सांगितले. विशेष म्हणजे शिवसैनिकांचा एकीने यासाठी आवाज दुमदुमला. एकही शिवसैनिक भाषणातून निघून गेला नाही. भर पावसातही उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पूर्णपणे यशस्वी झाला. त्याचप्रमाणे मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे भाषण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता परिणाम करणारे झाले.
संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाडा पाण्यात वाहून गेला. सोलापूर, अहिल्यानगर, कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्र खानदेशात अतिवृष्टी झाली. मुंबई आणि कोकणालाही पावसाने धुऊन काढले. अतिवृष्टीने शेतकरी बेचिराख झाला आहे. शेतकऱ्यांना मदत देऊन त्यांना आधार देण्याची गरज आहे. ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे, परंतु महाराष्ट्र शासनाच्या संज्ञात ओला दुष्काळ बसत नाही. त्यांना प्रती हेक्टरी 50 हजार आर्थिक मदत मिळाली पाहिजे. परंतु फक्त साडेआठ हजार एवढीच तुटपुंजी मदत दिली जाते आहे. त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी शासनाने केली पाहिजे. ते शासनातर्फे केले नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करेल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तेव्हा टाळ्यांचा कडकडाटात शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.
अतिवृष्टीने बेहाल झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंचे हे पाऊल महत्वपूर्ण आहे, असे म्हणावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या संदर्भाततील महत्त्वपूर्ण घोषणा म्हणता येईल. त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल हे दिसून येईलच. मुंबई महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमचे हिंदुत्व हे नकली आहे, असा भाजपतर्फे आरोप केला जातो आणि त्यांच्या मुंबईचा महापौर ‘खान’ असेल असाही आरोप केला जातो. यावर बोलताना भाजपावर जोरदार हल्ला करून भाजपची मुंबईत सत्ता आली तर, मुळात ती येणारच नाही.. पण आली तर ते मुंबईला आदानीच्या घशात घालणार आहेत. त्यामुळे शिवसेनाच मुंबई वाचू शकते, असे ठाकरेंनी जाहीर केले.
लडाखचे संशोधक व गांधीवादी नेते सोनम वांगचूंग यांना केंद्रातील मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा खाली जी अटक केली, त्याचा ठाकरेंनी तीव्र शब्दात निषेध केला. सोनम वांगचुक यांच्या अटकेचे देशभर पडसाद उमटत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या मुद्द्याला हात घातला. त्याचे विरोधात जोरदार निषेध नोंदवला जात आहे. त्याचबरोबर भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये आशिया कपच्या फायनलमध्ये भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाला. क्रिकेटच्या मैदानावरच्या विजयाची तुलना ऑपरेशन सिंदूरशी पंतप्रधान मोदींनी करून ट्विट केले. त्याबद्दल पंतप्रधान मोदींवर कठोर शब्दात प्रहार देखील केला. राज्य, मुंबई आणि राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांना स्पर्श करून उद्धव ठाकरे यांचे 40 मिनिटांचे भाषण गाजले.
या दसरा मेळाव्याला मनसेचे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहतील, असे सर्व शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वाटत होते. परंतु राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित नसले तरी उद्धव ठाकरेंनी ‘आमची युती होणार’ असल्याचे सुतोवाच आपल्या भाषणात करून त्याबाबत लोकांच्या मनातील संभ्रम दूर केला. याचा अर्थ त्यांची युती संदर्भातील सकारात्मक बोलणी चालू असून ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी जाहीर होईल, हे स्पष्ट होते. सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर जे अतिवृष्टीचे संकट आले आहे, त्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी जी घोषणा केली आणि आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन जर सत्ताधाऱ्यांनी विरुद्ध लढा दिला तर सत्ताधाऱ्यांना हे महागात पडेल, यात शंका नाही. त्यातच महायुती सरकार मधील भाजपचे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सध्या सख्य दिसून येत नाही.
मुंबई महापालीकेच्या निवडणुकीसाठी महायुती एकत्र लढेल आणि बाकी राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपने स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केलीच आहे. त्यामुळे आगामी निवडणुका चांगल्याच गाजतील. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचे प्रभावी भाषणाने महायुतीमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते दानवे यांचे भाषणही मुद्देसूद झाले..!