.. तेच लोक पक्ष बुडवायला निघालेत ; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकनाथ शिंदेच्या बंडानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सामनातील बहुप्रतीक्षित मुलाखतीचा (Uddhav Thackeray Interview)पहिला भाग प्रसारित झाला.  या मुलाखतीत त्यांनी बंडखोरीसह इतर मुद्यांवर भाष्य केले. तसेच त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट देखील केले.  शिवसेना नेते आणि ‘दैनिक सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.

काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो. याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या. असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मला कुठेही त्या अनुभवातून सहानुभूती नकोच आहे. म्हणून खरं तर मी या विषयावर बोलणं टाळतो, पण तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं.

सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मानेत एक ‘क्रॅम्प’ आला आणि माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. श्वास घेताना मी पाहिलं तर माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ‘ब्लड क्लॉट’ आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, त्या ‘गोल्डन अवर’मध्ये ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बसलो आहे. त्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार? तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जेव्हा मी तुम्हाला (बंडखोरांना) पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात हालचाली केल्या असल्याचे घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.