‘शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा’ : उद्धव ठाकरेंचे आवाहन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे गटाने भाजपचा पाठींबा मिळवून सत्ता स्थापन केली.तसेच शिंदे गटाकडे बहुमत असल्याने त्यांनी शिवसेना पक्ष व चिन्हावर आपला दावा केला आहे. दरम्यान  ‘शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा केला आहे. अशा परिस्थितीत आपल्या हातातून चिन्ह गेल्यास पक्षाचे नवीन चिन्ह घरोघरी पोहोचवण्यास तयार राहा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

.. तर गाफील राहू नका

नुकत्याच झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेतून 40 आमदार फुटल्यामुळे आपले सरकार पडले आहे. आपल्याच पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर बंडखोर गटाने दावा केला आहे. अशा परिस्थितीत धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न होणार आहे. कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी गाफील राहू नका, शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा.

शिवसेनेच्या मतदारांमध्ये संभ्रम राहू नये

निवडणूक चिन्ह गोठवल्यास शिवसेनेला आगामी मुंबईसह राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अशा वेळी शिवसेनेच्या मतदारांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

11 जुलैला सुनावणी

दरम्यान, 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवावे, अशी याचिका शिवसेनेतर्फे सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. 11 जुलैला यावर सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यास शिवसेना पक्ष व चिन्हाचा ताबा मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जाणार आहे. तसेच, या सुनावणीमध्येही शिवसेना कुणाची याबाबतही स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

आमचाच शिवसेना पक्ष खरा

40 बंडखोर आमदारांनंतर एकनाथ शिंदे गटात ठाणे, नवी मुंबईतील बहुतांश नगरसेवक सामिल झाले आहेत. याशिवाय शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदारही आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील पदाधिकारीही शिंदे गटांच्या आमदारांसोबत जात आहेत. त्यामुळे शिंदे गट दिवसेंदिवस मजबूत होत असून आमचाच शिवसेना पक्ष खरा असल्याचे शिंदे गटाचे म्हण्णे आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळातील लढाईसोबत शिवसेनेकडून कायदेशीर लढाईसाठीही जोर लावला जात आहे. मुंबई, दिल्लीतील कायदेतज्ज्ञ, वकीलांसोबत शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार हे आता 11 जुलैला स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.