चोपड्यात केली कारवार्इ : एलसीबीची धडक
जळगाव : जिल्ह्यात अवैध शस्त्रांच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याच्या हालचालींवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण सुमारे 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अवैध शस्त्रधारकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, अटवी गावाकडून चोपडा दिशेने दोन संशयित इसम मोटारसायकलवरून गावठी पिस्तुल घेऊन फिरत आहेत. त्यानुसार सापळा रचून संशयित मोटारसायकल (क्र. MH-19-S-1460) अडवून तपासणी केली असता राहुल कुबेरसिंग पवार (वय 22, रा. अटवी, ता. चोपडा, जि. जळगाव) व गणपत प्रभाकर किर्तन (वय 28, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) यांच्याकडून 1 गावठी पिस्तुल, 5 जिवंत काडतुसे, 1 मोटारसायकल व 2 मोबाईल फोन असा मुद्देमाल आढळून आला. विनापरवाना शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ते फिरत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, विलास सोनवणे तसेच पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



